आपल्या जबरदस्त अदाकारीसाठी ओळखली जाणारी तापसी पन्नू तिच्या परखड स्वभावासाठीही ओळखली जाते. या स्वभावामुळे तापसी सतत चर्चेत असते. सध्या ती अशाच एका कारणाने चर्चेत आहे. होय, करिना कपूरच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये तापसीने एक प्रसंग सांगितला. तिने शेअर केलेल्या या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे. तर किस्सा आहे, दिल्लीतला. दिल्लीत असताना तापसी अनेकदा गुरुपर्वाच्यावेळी गुरुद्वारामध्ये जात असे. या गर्दीच्या ठिकाणी एकदा तिच्यासोबत छेडछाडीची घटना घडली.
तापसीने सांगितले की, गुरूपर्वावेळी आम्ही सगळे गुरद्वारामध्ये जायचो. याठिकाणी इतकी गर्दी असायची की, एकमेकांना धक्का लागायचाच. मी सुद्धा या अनुभवातून गेले होते. अशावेळी विचित्र वाटायचे पण मी दुर्लक्ष करायचे. एकदा मी अशीच गुरद्वारात गेली. नेहमीप्रमाणे गर्दी होती. का कुणास ठाऊक पण, यावेळी काहीतरी वाईट घडेल, असे मला सुरूवातीपासूनच वाटत होते. कदाचित त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या तयार होते. अचानक एक माणूस मला जाणूनबुजून मागून स्पर्श करत असल्याचे मला जाणवले. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले. पण पुन्हा त्या माणसाने मला स्पर्श केला. तो वाईट स्पर्श जाणवताच मी झटकन झटकन माझा हात मागे नेला त्या माणसाचे बोट पकडून ते जोरात पिरगाळले आणि काही झालेच नाही, अशा थाटात मी क्षणात तिथून गायब झाले.
तुम्हाला आठवत असेलच की, ‘पिंक’ सिनेमातही तापसीने छेडछाड करणा-या मुलांना जबरदस्त धडा शिकवला होता. तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘शाब्बास मितू’ असे या बायोपिकचे नाव आहे. 5 फेबु्रवारी 2021 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.