बॅलिवुड अभिनेता ताहीर राज भसिन पहिल्यांदाच लडाखमध्ये चित्रिकरण करण्यास अत्यंत उत्सुक आहे. ये काली काली आंखे या वेबसीरिज चित्रिकरणासाठी ताहीर जवळपास दोन आठवडे या निसर्गरम्य परिसरात चित्रिकरण करणार आहे.
हा तरुण अभिनेता म्हणाला, “लडाखमध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे आणि इथे चित्रिकरण करणं म्हणजे अगदी स्वप्नवत आहे. इथले वाळूमय पर्वत हे सगळं अगदी नयनरम्य आहे, फ्रेममध्ये दिसणारा प्रत्येक भाग म्हणजे ये काली काली आंखेसाठी पुढील काही दिवस आम्ही इथे जे चित्रिकरण करणार आहोत त्यातील प्रत्येक दृश्याचं मर्म अजून टिपणारा आहे. लक्ष्य, जब तक हैं जान, 3 इडियट्स असे सिनेमे आणि त्यातील लडाखची सुंदर दृश्यं पाहत मी मोठा झालोय. या अनोख्या प्रदेशात चित्रिकरण करावं, असं मला नेहमी वाटायचं.”
ताहीर नेहमी लडाखला पुन्हा जाता यावं अशी प्रार्थना करायचा. तो म्हणाला, “मला प्रवास फारच आवडतो आणि गेलं वर्षभर शहरात अडकून पडल्याने तर बाहेर पडण्याची, देशातील वेगवेगळ्या भागांना भेट देऊन तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा अत्यंत तीव्र झाली आहे. ”
तो पुढे म्हणाला, “निसर्ग आहे, लडाखसारख्या खास स्थळाच्या पार्श्वभूमीवर सेट लागलाय आणि समाधान देणारं कामही आहे, हे म्हणजे एक कम्प्लिट पॅकेज आहे. मी पंधरा वर्षांनी लडाखला जातोय आणि नव्या डिजिटल सीरिजच्या चित्रिकरणासाठी तिथे जाता येतंय यापेक्षा छान काय असू शकेल.”