हिरो-हिरोईन बनण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण ग्लॅमर इंडस्ट्रीत येतात. पण यापैकी फार थोड्या लोकांच्या वाट्याला ग्लॅमर इंडस्ट्रीतलं ग्लॅमर येतं. उर्वरित लोक आले तसे अंधारात गुडूप व्हावेत तसे गुडूप होतात. एक अभिनेत्री अशीच. तिचं नाव तल्लुरी रामेश्वरी (Talluri Rameshwari). अनेकांना हे नाव आता आठवतही नसावं. मात्र एक काळ तिने गाजवला. बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिची गणना व्हायची.
80 च्या दशकात तिचं मोठं नाव होतं. सावळ्या रंगाची तल्लूरी रामेश्वरीनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘दुल्हन वहीं जो पिया मन भाए’ या एका सिनेमाने तिला एका रात्रीत स्टार केलं. यानंतर तिच्या घराबाहेर जणू निर्मात्यांच्या रांगा लागल्या. साहजिकच यानंतर रामेश्वरीनं कधीच मागे वळून बघितलं नाही. मान अभिमान, अग्निपरीक्षा अशा हिट सिनेमांत तिने काम केलं. आशा या गाजलेल्या सिनेमानं तिला एक नवी ओळख दिली. बॉलिवूड गाजवणाऱ्या रामेश्वरीनं तेलगू फिल्म इंडस्ट्रीही गाजवली. आता ती एक सुपरस्टार बनली होती. सगळीकडे तिच्या सौंदर्याची अन् अभिनयाची चर्चा सुरू होती. पण यशाच्या शिखरावर असताना रामेश्वरीसोबत असं काही घडलं की, त्या एका क्षणानं तिचं आयुष्यच बदललं.
अपघात झाला आणि सगळं बदललं....एक सुपरस्टार म्हणून मिरवत असताना रामेश्वरीचा गंभीर अपघात झाला. ती घोड्यावरून पडली आणि तिच्या डोळ्याला जबर मार लागला. डॉक्टरांनी तिला सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मात्र सर्जरीसाठी नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार होती. रामेश्वरी सर्जरीसाठी न्यूयॉर्कला गेली. पण यादरम्यान सगळं काही बदललं होतं. अनेक चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आलं. अनेक अभिनेत्रींनी तिला रिप्लेस करण्याचा प्रयत्न केला आणि यात त्या यशस्वीही झाल्यात. रामेश्वरीच्या करिअरला मात्र उतरती कळा लागली.
लग्न केलं आणि संसारात रमली...अपघात, करिअरमधील चढऊतार असं सगळं सुरू असताना रामेश्वरीनं तिचा वर्गमित्र व पंजाबी अभिनेता-निर्माता दीपक सेठसोबत लग्नगाठ बांधली. पती निर्माता असूनही रामेश्वरीने कधीच सिनेमात काम केलं नाही. पंजाबी सिनेमात काम करण्याची संधी तिला मिळाली होती, पण तिने नकार दिला.
दीपक सेठसोबत लग्न केल्यानंतर लोक तिला रामेश्वरी सेठ या नावानेही ओळखू लागले आहे. आता ती अभिनेत्री नाही तर बिझनेसवुून झाली आहे. माहेश्वरी सेठ स्किन केअर स्टार्टअपचा बिझनेस ती सांभाळते. आपल्या दोन्ही मुलांसोबत व पतीसोबत ती आनंदी आहे.