प्रसिद्ध तमिळ टेलिव्हिजन अभिनेता लोकेश राजेंद्रन याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्याने वयाच्या 34 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा लोकेश राजेंद्रन 'मर्मदेसम' या मालिकेतील कामासाठी ओळखला जातो. 1996 मध्ये आलेल्या 'विठू करुप्पू' या शोमध्ये लोकेशने साकारलेली 'रासू'ची भूमिका लोकांना आजही आवडते. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
लोकेश राजेंद्रन यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाने विजयकांत, प्रभू यांच्यासह अनेक शीर्ष तमिळ कलाकारांसोबत 150 हून अधिक मालिका आणि 15 चित्रपट केले आहेत. त्यांनी सांगितले की, लोकेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. ते म्हणाला, 'मला एक महिन्यापूर्वी समजले की लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही गैरसमज सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी पत्नीकडून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस आली होती. त्यामुळे तो तणावाखाली होता. मी शुक्रवारी शेवटच्या वेळी लोकेशला पाहिले, त्याने सांगितले की त्याला पैशांची गरज आहे आणि मी त्याला दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक समस्यांमुळे लोकेशला दारूचे व्यसन लागले होते आणि तो चेन्नई मोफासिल बस टर्मिनस (सीएमबीटी) या ठिकाणी अनेकदा झोपलेला असायचा. . सोमवारी ३ ऑक्टोबरला बस टर्मिनसवर तो झोपलेला होता. त्यावेळी त्याची तब्येत ठिक नसल्याचे, काहीजणांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेला फोन केला आणि पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली. लोकेशला सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तापस पोलिस करतायेत.