अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याचा मृतदेह नुकताच रिक्षात मिळाला आहे. या अभिनेत्याच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
संध्या आणि भारथ या प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता विरूत्छगाकांत बाबूचे नुकतेच निधन झाले. चेन्नईतील एका रिक्षामध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. मृत्येचे अद्याप कारण कळले नसले तरी त्याचे निधन झोपेतच झाले असल्याचे म्हटले जात आहे.
विरूत्छगाकांत बाबूला चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने त्याच्याकडे अजिबातच पैसे नव्हते. त्याची आर्थिक परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून खालवली होती. त्यात त्याच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने त्याला चांगलाच धक्का बसला होता. त्याचे वजन देखील कित्येक किलोने कमी झाले होते. हातात पैसे नसल्याने विरूत्छगाकांत बाबू कधी देवळात तर कधी रिक्षात राहात असे.
विरूत्छगाकांत बाबूला काही वर्षांपूर्वी कोरिओग्राफर साई धीना यांनी चेन्नईतील एका मंदिराच्या बाहेर पाहिले होते. त्यावेळी त्या त्याला घरी घेऊन आल्या होत्या आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याला काम देण्याचे आवाहन दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकांना केले होते. पण त्याला चित्रपटात काही काम मिळाले नाही. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या काधल या चित्रपटानंतर तो कोणत्याच चित्रपटात दिसला नाही.
विरूत्छगाकांत बाबूला कामाची गरज असताना दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कोणीही त्याच्या मदतीसाठी धावले नव्हते. पण आता त्यांच्या मृत्युनंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.