चित्रपटाच्या सेटवर अनेक अपघात घडतात, कलाकार जखमी होतात. अशाच एका अपघातातून तामिळ स्टार व निर्माता विशाल कृष्ण रेड्डी (Vishal Krishna Reddy) बालंबाल बचावला. होय, विशालने या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. विशाल त्याच्या आगामी ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता, त्यावेळी सेटवर मोठा अपघात घडता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून विशाल बचावला. जे काही घडलं ते बघून विशालही हादरला. क्षणभर सुन्न झाला. सध्या जीव वाचल्याबद्दल विशाल देवाचे आभार मानतोय. त्या काही सेकंदांचा काय घडलं, त्याचा एक व्हिडीओ विशालने सोशल मीडियावर शेअर करत आणि देवाचे आभार मानले आहेत.
मार्क अँटनीच्या शूटिंगदरम्यान सेटवर कास्ट आणि क्रूची मोठी गर्दी होती. एका महत्त्वाच्या ॲक्शन सीन शूट होत होता. या ॲक्शन सध्मध्ये ट्रकचाही वापर होणार होता. मात्र अचानक ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक वेगाने पुढे निघाला. एक ज्युनिअर आर्टिस्ट शॉटसाठी उभा होता आणि त्याच्यासोबत विशालसुद्धा होता. सीननुसार, ट्रकला एका भिंतीला तोडून पुढे थांबायचं होतं. मात्र ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो सुसाट पुढे निघाला. हे पाहून सेटवर एकच पळापळ झाली. याच घटनेत विशाल बालंबाल बचावला. काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रकचालकाचं नियंत्रण सुटल्याची माहिती तूर्तास समोर येत आहे.
विशाल त्याच्या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीनसाठी ओळखला जातो. त्याचं फिल्म फॅक्ट्री नावाचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस आहे. विशाल हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते जीके रेड्डी यांचा मुलगा आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या विशालने 2004 मध्ये ॲक्टिंग डेब्यू केला होता.