एकीकडे देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना साऊथ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. तामिळ चित्रपट सृष्टीतील अभिनेता श्रीधर आणि त्याची अभिनेत्री बहीण जया कल्याणी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.श्रीधर व जया कल्याणी हे दोघेही चेन्नई येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. घरातून दुर्गंधी येत असल्याचे पाहून शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिस दार तोडून हात शिरले असता दोन्ही भावाबहिणीचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले. दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृतावस्थेत आढळून आलेत. गेल्या 7 वर्षांपासून हे दोघे या घरात राहत होते.
श्रीधर व जया कल्याणी दोघेही तामिळ मालिकांमध्ये काम करत होते. दोघेही अविवाहित होते. साधारण 45 ते 50 वयवर्ष असलेल्या या दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने दोघांचा मृतदेह स्टेनली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. लॉकडाऊनमध्ये काम आणि परिणामी पैसे नसल्याने या दोघा भाऊ-बहिणींनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्व गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे अनेक लहान कलाकार, रोजंदारीवर काम करणारे कामगार, स्पॉटबॉय अशांच्या हातांना काम नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. हाताला काम नसल्याने आर्थिक संकट शिवाय भविष्याची चिंता यामुळे अनेक जण नैराश्याच्या खाईत ओढले गेले आहेत. अशा घटनांच्या रूपात त्याचे परिणाम हळूहळू समोर येत आहेत.