Join us

काजोलमुळे संपलं तनिषा मुखर्जीचं फिल्मी करिअर? वाचा, ती काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 3:12 PM

एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून मिरवणारी तनिषा बोटावर मोजण्याइतक्या सिनेमात दिसली आणि आली तशी गायब झाली...

ठळक मुद्देतनिशानं ‘Sssshhh…’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

तनिषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) मोठी बहीण काजोलच्या (Kajol) पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये आली खरी. पण तिचा टिकावं काही लागला नाही. एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून मिरवणारी तनिषा बोटावर मोजण्याइतक्या सिनेमात दिसली आणि आली तशी गायब झाली. लोकांना तिच्या सिनेमांपेक्षा काजोलची बहीण इतकीच तिची ओळख लक्षात राहिली. कदाचित काजोलची बहीण नसती तर तनिषा आजघडीला मोठी सुपरस्टार असती. अर्थात हे आमचं नाही तर खुद्द तनिषाचं म्हणणं आहे.हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द तनिषानं तिच्या करिअरबद्दल अनेक खुलासे केलेत. बॉलिवूडमधून बाद होण्याचं कारणही तिनं सांगितलं.

ती म्हणाली, ‘ मी बॉलिवूडमध्ये आले तेव्हा काजोल मोठी स्टार होती आणि मी तिच्याच सारखा अभिनय करावा, तिची कॉपी करावी ही लोकांची अपेक्षा होती. मी काजोलसारखं दिसावं, तिच्यासारखं बोलावं, अशी दिग्दर्शकांचीही अपेक्षा होती. पण मी काजोल नव्हते, मी तनिषा होते. सुरूवातीला काजोल व माझी तुलना व्हायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. राग यायचा. पण आज तुलना करणाºया त्या लोकांची मला किव येते. बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. पण यश मिळालं नाही. माझ्यामते, काही गोष्टी तुमच्या नशिबावर अवलंबून असतात.’

कदाचित काजोलची बहीण नसती तर...काजोल एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे. करिअरमध्ये तिनं काही चुका केल्या नाहीत, असं नाही. ती सुद्धा अनेकदा चुकली. पण त्याच चुका मी केल्यावर माझी खिल्ली उडवली गेली. कदाचित मी काजोलची बहिण नसती तर आज बॉलिवूड सुपरस्टार असती असं कधीकधी वाटतं, असेही तनिषा म्हणाली.

तनिशानं ‘Sssshhh…’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पॉपकॉर्न’ या चित्रपटात ती झळकली. पण तिचे दोन्ही चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. दरम्यान 2005 साली  नील अँड निकी  या चित्रपटाद्वारे तिला रिलॉन्च केलं गेलं. या बिग बजेट चित्रपटातून उदय चोप्राचाही डेब्यू होणार होता. त्यामुळं चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. पण बॉक्स आॅफिसवर हा सिनेमाही आपटला आणि याचसोबत तनिषाच्या करिअरची गाडी रूळावरून घसरली ती कायमचीच.

टॅग्स :काजोल