अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे 8 आॅक्टोबरला नाना माध्यमांसमोर येऊन या आरोपांबाबत स्पष्टीकरण देणार होते. पण ऐनवेळेस नियोजित पत्रकार परिषद नानांनी रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.
या कारणासाठी पत्रकार परिषद रद्द
तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकिलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, याच कारणामुळे त्यांनी आजची पत्रकार परिषद रद्द केल्याचे म्हटले जात आहे.
जे खोटं आहे ते खोटं आहे - नाना
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाना जोधपूरमध्ये 'हाऊसफुल्ल-4' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. याच सिनेमाचं शूटिंग आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या नाना पाटेकर यांना माध्यम प्रतिनिधींनी जोधपूर विमानतळावर गाठलं. पत्रकारांनी नाना यांना तनुश्रीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. जे खोटं आहे ते खोटं आहे इतके बोलून नाना तेथून निघाले होते.
तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकिलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र नानांकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. उलट आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप करत आपलीही वकिलांची टीम सज्ज असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबईत परतल्यानंतर तरी नाना या सगळ्या प्रकरणावर मौन सोडतील?. नाना काय बोलतील? यांवर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
पण आता पत्रकार परिषदच रद्द झाल्यामुळे नाना कधी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.