चित्रांगदा सिंग लवकरच 'बाजार' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती सैफ अली खानच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन ती करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नुकत्याच प्रसारमाध्यमांसोबत गप्पा मारल्या. यावेळी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल तिला विचारले असता तिने तनुश्री दत्ताला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
चित्रांगदा सिंग म्हणाली की, केवळ बॉलिवूडमध्येच स्त्रियांना लैंगिक छळाला सामोरे जावे लागते असे नाही तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रत्येक स्त्रीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठविणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तिला नावे न ठेवता समाजाने तिच्या पाठीशी उभे रहावे. पुरुष स्त्रियांचा आदर करायला शिकले तर ही समस्याच निर्माण होणार नाही. तनुश्री या सगळ्या प्रकरणानंतर बॉलिवूडपासून दूर गेली. कोणत्याही कलाकाराला केवळ अशा परिस्थितीमुळे आपले करियर सोडावे लागणे हे चुकीचे आहे. #Metoo या मोहिमे अंतर्गत तनुश्रीने २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या आरोप केला आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत.