सध्या सर्वत्र अभिनेत्री तनुश्री दत्ता हे नाव चर्चेत आहे. २००८ हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तिने केला आणि #MeToo या चळवळीला पुन्हा सुरूवात झाली आहे. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते असा धक्कादायक आरोपही तिने नाना पाटेकर यांच्यावर केला आहे. तब्बल 10 वर्षांनंतर तनुश्रीने हे प्रकरण समोर आणलं आहे. मात्र 2008 ते 2018 या दहा वर्षांच्या काळात तनुश्री कुठे होती?. काय करत होती? याचा कुणालाही फारसा पत्ता नाही. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आहे की या दहा वर्षात तनुश्रीने नेमकं काय केलं.
२००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली. मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्रीचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं.
करियरमध्ये मिळणारं अपयश तनुश्रीला रूचलं नाही. ती निराश झाली आणि याच नैराश्यातून ती डिप्रेशनमध्ये कधी गेली हे तिचं तिला कळलं नाही. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने त्यावेळी आध्यात्माचा सहाला घेतला. या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला. बराच काळ तिने कोईम्बतूर इथल्या जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात घालवला. लडाख यात्रेदरम्यान तिने केशवपनही केलं. एका मुलाखतीमध्ये तिने आपला लडाखमधील अनुभवसुद्धा शेअर केला. बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये सरळ साध्या सोप्या श्वासोच्छवास तंत्राने खूप आराम मिळाल्याचे तिने या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितलं होतं. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले आहे. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेसुद्धा तनुश्री आणि आध्यात्माचा संबंध कायम राहिला. सेलिब्रिटी असल्याने तिथल्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केलं जातं. दोनच महिन्यांपूर्वी ती भारतात परतली.