तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादात उडी घेऊन राखी सावंत चर्चेत आली. आता याच प्रकरणावरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा राखीने केला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या अश्लिल व जीवे मारण्याची धमकी देणारे कॉल येत असल्याचे राखीने तक्रारीत म्हटले आहे. तनुश्री प्रकरणात नाना पाटेकर यांची पाठराखण केल्यामुळे तनुश्रीचेच समर्थक आपल्याला धमकावत असल्याचा दावाही तिने केला आहे. पोलिसांत लेखी तक्रार देतानाचा फोटो शेअर करत राखीने याबाबत माहिती दिली आहे.
‘हॉर्न ओके प्लीज’च्या गाण्याच्या शूटवेळी नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या ज्या गाण्याच्या शूटवेळी ही घटना घडली होती, ते गाणे नंतर राखी सावंतने केले होते. तनुश्रीने गाणे शूट करण्यास नकार दिल्यावर ऐववेळी यात राखीची वर्णी लागली होती. त्यामुळे अलीकडे या संपूर्ण घटनेसंदर्भात राखीने विस्ताराने सांगितले होते. शिवाय घटनेवेळी तनुश्री ड्रग्जच्या नशेत होती, असा खळबळजनक आरोपही केला होता.‘त्या दिवशी मी घरी बसले असताना मला मास्टरजीचा(गणेश आचार्य) फोन आला. राखी, लवकर सेटवर ये. तुला गाणे करायचे आहे, असे ते मला म्हणाले. मी त्यांना गाणे पाठवण्याची विनंती केली. यावर तू फक्त ये. मी गाणे करतोय ना, मग तुला काय करायचे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या फोननंतर मला नाना पाटेकर यांचाही फोन आला. त्यांनीही मला सेटवर लवकर पोहोचण्यास सांगितले. यानंतर मी घाईघाईत सेटवर पोहोचले. पण सेटवरचे चित्र पाहून मला धक्काचं बसला. काय झाले, हे कळायला मार्ग नव्हता. तिथे मेकअप व्हॅन होती. खूप सारे लोक होते़ मीडिया होता़ तोडफोडही झालेली दिसत होती. मी गणेश आचार्य यांना विचारले तर हे गाणे तनुश्रीचे होते. आम्ही थोडे शूट केलेही. पण आता ती कोआॅपरेट करत नाहीये, असे त्यांनी मला सांगितले. यानंतर मी कॉल करून बघते, असे म्हणून तनुश्रीला कॉल केला. पण तिने माझा कॉनही उचलला नाही़. त्यावेळी डेजी शाह गणेश आचार्य यांची अस्टिस्टंट होती. तिनेचं मला सगळे काही सांगितले. डेजी स्वत: १० वेळा तनुश्रीला बोलवायला गेली होती. पण तिने आपल्या व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडला नाही. यानंतर तनुश्रीच्या मेकअप आर्टिस्टने मला सांगितले की, तनुश्री ३-४ तासांपासून बेशुद्ध आहे. मी का? असे त्याला विचारले असता ती ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली असल्याचे त्याने मला सांगितले, असे राखीने सांगितले होते.