Join us

Tanushree Dutta-Nana Patekar Controversy : आतापर्यंत काय-काय घडलं?... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 11:22 AM

Tanushree Dutta-Nana Patekar controversy : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #metoo मोहीम पुन्हा जोर धरू लागली आहे.#metoo मोहीमेच्या माध्यमातून अनेक जणी स्वतःवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #metoo मोहीम पुन्हा जोर धरू लागली आहे.#metoo मोहीमेच्या माध्यमातून अनेक जणी स्वतःवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य महिलादेखील न घाबरता पुढे आल्या आहेत. या चळवळीचा एक भाग म्हणजे तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप तनुश्रीनं केला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?'हॉर्न ओके प्लीज' सिनेमातील एका गाण्याचं शूटिंग सुरू असताना नाना पाटेकरांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरिओग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात हे दाखवण्याचा अट्टहास नाना करत होते, असे तनुश्रीनं सांगितले.  एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं ही सारी हकीकत सांगितली. करारानुसार संबंधित गाणं सोलो होते, पण नानांना माझ्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता, असा गंभीर आरोपही तिने केला. ''कोरिओग्राफर मला स्टेप शिकवत असताना ते मध्येच येत, माझा हात पकडत. मी त्यांच्या या वागण्याला वैतागली आणि  चित्रपटाच्या निर्मात्यांकडे तक्रार केली. याचा परिणाम म्हणजे, मला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले. आजही ती घटना आठवली की दचकायला होते, असा गंभीर आरोप तिने केला आहे.  माझ्यासोबतच नाही तर अन्य काही अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करुनही नाना चित्रपटसृष्टीत काम करत असल्याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे. कोणीही घाबरुन नानाविरोधात बोलत नसल्याचंही तिने म्हटले. 

तनुश्री दत्ताविषयीची माहिती2003मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005मध्ये 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'चॉकलेट', 'ढोल', 'रिस्क', 'स्पीड' या सिनेमांमध्येही झळकली.  

वादात कोरिओग्राफर गणेश आचार्यची उडी

या प्रकाराबाबत तनुश्रीने कोरिओग्राफर गणेश आचार्यलाही दोषी ठरवले. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर जे काही झाले, त्यात गणेश आचार्य याचाही हात असल्याचा आरोप तनुश्रीनं केला आहे. मदतीसाठी येण्याऐवजी तो उभा राहून तमाशा पाहत राहिला, असे ती म्हणाली. तनुश्रीनं केलेल्या आरोपांचं खंडन करत गणेश आचार्यने स्पष्टीकरण दिले की,  एक तर हे खूप जुने प्रकरण आहे. त्यामुळे नेमके काय झाले होते, हे मला नीट आठवत नाही. पण मला जितके आठवते त्यानुसार, हे एक डूएट गाणे होते. त्यादिवशी सेटवर काहीतरी झाले होते आणि शूटिंग 3-4 तास थांबवण्यात आलं. कलाकारांमध्ये गैरसमज होते. पण मी इतके खात्रीपूर्वक सांगेन की, जे काही आरोप होत आहेत, तसे काहीही घडले नव्हते. नाना पाटेकर एक चांगली व्यक्ती आहे़. ते असे काहीच करू शकत नाहीत. ते कायम लोकांची मदत करतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर नानांचे उपकार आहेत, असे सांगत गणेश आचार्यनं नानांचा बचाव केला. 

(तनुश्रीबाबत राखी सावंतने म्हटले की...) - सविस्तर वाचातनुश्री दत्तानं शूटिंगला नकार दिल्यानंतर राखी सावंतला हे गाणं मिळालं. या घटनेबाबत सांगताना राखीनं वेगळीच कहाणी कथन केली.‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्या शूटिंगवेळी तनुश्री दत्ता ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली होती आणि म्हणून ती गाण्याचे शूट करू शकली नव्हती, असे राखीनं सांगितले. 

(रेणुका शहाणेकडून तनुश्री दत्ताची पाठराखण, लिहिले खुले पत्र!)

8 ऑक्टोबर 2018 - नानांनी या कारणामुळे पत्रकार परिषद केली रद्द

तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांनी वकिलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवली.  यानंतर 8 ऑक्टोबरला नाना पाटेकरगणेश आचार्य, सामी सिद्दीकी असे सर्वजण एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेणार होते. पण नानांनी पत्रकार परिषद ऐनवेळेस रद्द केली. कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांनी पत्रकार परिषद रद्द केल्याचे म्हटले जात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.  

28 सप्टेंबर 2018 : तनुश्रीला पाठवली कायदेशीर नोटीसतनुश्री दत्तानं केलेले आरोप फेटाळल्यानंतर नाना पाटेकरांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली. तनुश्री दत्ताने केलेले आरोप खोट व बिनबुडाचे आहेत, असे नानांच्या वकिलांनी सांगितले. 

(Tanushree Dutta Harassment Case : तनुश्री दत्ताच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल!!)

27 सप्टेंबर 2018 : नानांनी सोडलं मौनतनुश्रीच्या आरोपांवर मौन सोडत नाना पाटेकर यांनी तिचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. सेटवर 100-200 लोक हजर होते. या सर्वांसमोर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असे ती का म्हणतेय, मला ठाऊक नाही. शेवटी कोणी काय बोलावं, हे मी कसे ठरवणार. मी फक्त एवढेचं सांगेन की, कोणी काहीही म्हणो, मला माझ्या आयुष्यात जे करायचे तेच मी करणार, असे नाना पाटेकर यांनी म्हटलंय.  

- मनसेकडून धमकावण्यात आल्याचा तनुश्री दत्ताचा आरोप

तनुश्री दत्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून टाकण्याचा इशारा दिला. 

‘बिग बॉस’ स्वर्ग अन् सलमान खान काही देव नाही!! - तनुश्री

‘बिग बॉस 12’ घरात जाण्यासाठीच तनुश्रीने नानासोबतचे 10 वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून काढले, असा अनेकांचा आरोप आहे. यावर तनुश्रीनं मौन सोडले. ''मी हे सगळे ‘बिग बॉस 12’साठी करतेय, असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे'', असे तिनं स्पष्ट केले. ''तुम्हाला काय म्हणायचेयं, सलमान खान देव आणि ‘बिग बॉस’चे घर स्वर्ग आहे? असा सवालही तिने केला. काहींना सलमान देव आणि ‘बिग बॉस’चे घर स्वर्ग वाटत असेलही. पण मला अजिबात तसे वाटत नाही'', असे तनुश्री म्हणाली. 

 

(तिला मला स्पर्श करायचा होता...! नाना पाटेकर यांचा जुना व्हिडीओ व्हायरल!!)

2008 मध्ये ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यानंतर नाना पाटेकरांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली होती. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये नाना असे सांगत आहेत की, ‘माझ्या करिअरमध्ये माझ्यावर कोणीही असे आरोप केले नाहीत. ही मुलगी असे का बोलतेय, ते मला माहित नाही. मी तिला केव्हा स्पर्श केला, मला आठवत नाही. पूर्ण शूटिंगदरम्यान तिलाच मला स्पर्श करायचा होता. मला तर दूर पळायचे होते. आपण काय बोलतोय,हे त्या मुलीला कळायला हवे. काय झाले, हे मलाच अद्याप कळलेले नाही. रिहर्सलनंतर माझे शूटिंग संपणार होते. मी तिला म्हटले, बेटा तू व्हॅनमध्ये बस. मला नाचता येत नाही तर मला जास्त रिहर्सलची गरज आहे. सुरुवातीच्या तीन दिवस तिने मला खूप सहकार्य केले. असे काही होते तर तिने तेव्हाच सांगायला हवे होते. मला हे बोलतानाही शिसारी येतेय. मला वाईट वाटतेय. बच्ची को समजना चाहिए की ऐसे आरोप लगाना अच्छा नहीं है. मैं कुछ बोलूंगा तो अच्छा नहीं होगा, असेही ते या व्हिडीओत म्हणत आहेत.

ऐका अभिनेता जितेंद्र जोशीची वादावर प्रतिक्रिया -

दोन गटांत विभागलं बॉलिवूड

तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तिला समर्थन देणे आणि विरोध करणे यावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी तनुश्रीचे आरोप खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. पण अनेक जण तनुश्रीला पाठिंबा दर्शवत आहेत, तर काहींनी तटस्थ भूमिका मांडली आहे. 

प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर आदींनी तनुश्रीला पाठिंबा दर्शवला आहे.

सोनमने एका महिला पत्रकाराचे ट्विट रिट्विट करत म्हटले आहे की, ''मला तनुश्री व जेनिस दोघींवरही विश्वास आहे. जेनिस माझी चांगली मैत्रिण आहे. मला ठाऊक आहे की, काहीही झाले तरी ती खोटे बोलणार नाही. आपण सत्याच्या बाजूने उभे राहणार की नाही, हे आपल्यावर अवलंबून आहे''.

प्रियांकानेही फरहान अख्तरचे ट्विट रिट्विट करत तनुश्रीला पाठिंबा दिला.

''कोणतीही महिला स्वतःची बदनामी होईल, असे काही करणार नाही. तनुश्रीने बदनामीची भीती न बाळगता आवाज उठवला, यातच सगळे काही आले'', असे रिचा चड्ढाने म्हटले आहे.

ट्विंकल खन्नानेही तनुश्रीवर टीका करणाऱ्यांचे कान टोचलेत.  ''तनुश्रीला अयोग्य ठरवण्यापूर्वी विचार करा. कामाच्या ठिकाणी महिलांना अशा प्रकारांना सामोरे जावे लागते, हे लाजीरवाणे आहे'', असे खडेबोल ट्विंकलनं सुनावले आहेत.

तर परखड मतं मांडण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्करनेही एक व्हिडीओ शेअर करून तनुश्रीची पाठराखण केली आहे. 

 

 

 

टॅग्स :नाना पाटेकरतनुश्री दत्ताबॉलिवूड