अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) काही वर्षांपूर्वी मी टू (Me Too) मोहिमेमुळे चर्चेत आली होती. तिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. मीटू मूव्हमेंटमुळे बॉलिवूड इंडस्ट्री हादरली होती. मी टू मोहिम पुन्हा चर्चेत यायचं कारण म्हणजे सध्या मल्याळम सिनेइंडस्ट्रीत हेमा कमिटी रिपोर्टमध्ये अनेक अभिनेत्री, कलाकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. दरम्यान तनुश्री दत्ताने यानिमित्त नुकतीच एक मुलाखत दिली. यात तिने सहा वर्षांपासून आपल्याकडे काम नसल्याचा खुलासा केला.
मी टू मोहिमेला सहा वर्ष उलटून गेली आहेत. याचा इंडस्ट्रीत काही सकारात्मक परिणाम झाला का? याविषयी तनुश्री मुलाखतीत म्हणाली, " काहीही परिणाम झाला नाही. उलट मी टू प्रकरणामुळे मला काम मिळणं बंद झालं. मीटू मधील आरोपींनी माझ्याशी कामासाठी संपर्क केला. मात्र मी त्यांची ऑफर नाकारली. कारण मला चुकीचा संदेश द्यायचा नव्हता. परिणामासाठी तुम्हाला थोडा त्याग करावाच लागतो. डिसेंबर २०१८ मध्ये मला एका मोठ्या निर्मात्याने सिनेमा ऑफर केला होता. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. मात्र त्यांच्या दिग्दर्शकावरच मीटू चा आरोप होता. म्हणून मी लगेच नकार दिला."
ती पुढे म्हणाली, "आता विचार करा की यात कोणाचं नुकसान झालं. तर माझंच. कारण मी बऱ्याच काळापासून सिनेमांमध्ये काम केलेलं नाही. आता मी केवळ इव्हेंटमध्ये हजेरी आणि ब्रँड एन्डॉर्समेंट्स करत आहे. मला महिला सशक्तीकरणावर आधारित सिनेमात मुख्य भूमिका साकारायची इच्छा आहे. पण मीटूच्या वेळी मी तीही ऑफर नाकारली. काही वर्षांनंतरही तेच घडलं. मी काही चांगले प्रोजेक्ट साईन केले होते पण मला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलं आणि माझं खूप नुकसान झालं."
मी टू मोहिमेवेळी नाना पाटेकर, साजिद खान, आलोक नाथ यासह काही कलाकारांवर आरोप होते. काही वर्ष इंडस्ट्री मी टू आरोपांमुळे दबली होती. मात्र नंतर हे प्रकरण शांत झालं.