Join us

नाना पाटेकरांनी #MeToo आरोपांना 'खोटारडं' म्हटल्यावर तनुश्री दत्ताचं प्रत्युत्तर, म्हणाली -

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 2:57 PM

नाना पाटेकर यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांना नाकारलं. यावर तनुश्रीने मौन सोडलंय. काय म्हणाली बघा

नाना पाटेकर यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ता #MeToo  प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं. तनुश्री दत्ताने केलेले आरोप खोटे आहेत असं नाना पाटेकरांनी सांगितलं. अखेर या सर्व प्रकरणावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने प्रतिक्रिया दिली आहे. तनुश्रीने नाना पाटेकारांना 'खोटारडं' म्हटलं आहे. याशिवाय संपूर्ण मुंबईला माहितीये की नाना पाटेकर किती बनावट व्यक्ती आहेत, असंही ती म्हणाली.  

जगाला माहितीय नाना पाटेकर किती खोटारडे आहेत

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलंय की, "पॅथॉलॉजिकल खोटारडे आहेत ते. नाना पाटेकर किती मोठे खोटारडे आहेत हे आता सगळ्या जगाला कळले आहे. अनिल शर्माच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना यांनी वाराणसीतील मुलाच्या कानशिलात लगावली. नानांनी आधी मुलाला मारलं. नंतर हा शूटचा एक भाग आहे असं भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकांनी टीका केल्यावर नाना पाटेकरांनी अचानक यू-टर्न घेतला आणि मनापासून माफी मागितली."

तनुश्री दत्ता पुढे म्हणाली, "मी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते. माझी सर्वात मोठी खंत ही आहे की मी आयुष्यात एका फ्लॉप कॅरेक्टर आर्टिस्टसोबत गाणं करण्यास परवानगी दिली. ज्याची कोणीही पर्वा केली नाही. पुढे प्रोफेशनलरित्या मी गाण्याचं शूटींग पूर्ण केलं. आज संपूर्ण मुंबईला ठाऊक आहे की, नाना पाटेकर या बनवाट माणसाने मला कसे फसवले होते आणि मानसिकदृष्ट्या कसे टॉर्चर केले. नाना यांचा खोटेपणा त्यांच्याच वर्तुळात पूर्णपणे उघड झाला आहे. अशा प्रकारे अशी विधानं करुन स्वतःचा आणखी एक घोटाळा झाकण्याचा त्यांचा मार्ग आहे. ज्यामध्ये मला संपवण्याचा डाव रचला गेला आहे."

नाना पाटेकर तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपाबद्दल काय म्हणाले?

'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने मीटू मोहिमेतून केलेल्या आरोपांवर नाना पाटेकरांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "मला माहीत होतं की हे आरोप चुकीचे आहेत. म्हणून मला कधीच राग आला नाही. सगळे आरोप खोटे होते, तर मला राग का येईल? आणि या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. त्या घडून गेल्या आहेत. त्याबद्दल आता आपण काय बोलू शकतो? सगळ्यांना सत्य माहीत होतं. मी तेव्हा हे सांगू शकलो असतो. कारण, असं काही घडलंच नव्हतं. अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तू हे केलंस ते केलंस...मी याला काय उत्तर देऊ? मी काहीच नाही केलं, हे मी सांगायला हवं होतं का? पण, मला माहीत होतं की मी काहीच केलेलं नाहीये". 

टॅग्स :नाना पाटेकरतनुश्री दत्ताबॉलिवूड