अनुभव सिन्हा यांचा आगामी चित्रपट ‘मुल्क’चा ट्रेलर आज रिलीज झाला. या क्राईम आणि पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटाचा ट्रेलर अनेकार्थाने अंगावर रोमांच आणणारा आहे. कोर्टरूममधील दमदार युक्तिवाद, एकापेक्षा एक दमदार संवाद आणि एका अगतिक कुटुंबाची न्याय मिळवण्यासाठीची धडपड हे सगळे हृदयाचा ठाव घेणारे आहे.भारतातील राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी अनेक प्रश्नांना, समस्यांना खतपाणी दिले. ‘मुल्क’चा ट्रेलर नेमक्या या प्रश्नांवर बोट ठेवतो. अनेक धगधगत्या प्रश्नांसह एका असहाय्य कुटुंबाची कथा यात दिसते.
जिहादच्या नावावर दहशतवादी असल्याचा ठप्पा या कुटुंबाच्या माथ्यावर लावला गेलाय. या कुटुंबातीलच एक व्यक्ती म्हणजे, ऋषी कपूर यांचे संवाद समाजातील दाहक वास्तवाची जाणीव करून देणारे आहे. ‘ये मेरा भी उतना ही घर है जितना कि आपका..आप मेरी और ओसामा बिन लादेन की दाढ़ी में फर्क नहीं कर पा रहे तो भी मुझे हक है मेरी सुन्नत निभाने का’, हा त्यांच्या तोंडचा संवाद बरेच काही सांगणार आहे. आशुतोष राणाही कोर्टरूममध्ये दिसतोय. ‘ये धर्म के नाम पर निर्दोष लोगों की हत्या करते हैं और फिर बाद में कहते हैं कि हर मुसलमान ऐसा नहीं होता़ तो कौन..कौन कैसा है ये कौन बताएगा,’ अशा अनेक दमदार संवादांनी सजलेल्या या ट्रेलरमध्ये तापसी पन्नूही वकीलाच्या भूमिकेत दिसतेय. ऋषी कपूर एका मुस्लिम इसमाच्या भूमिकेत आहे. तापसी व आशुतोष वकीलाच्या भूमिकेत आहेत. प्रतीक बब्बर एका मुस्लिम तरूणाच्या भूमिकेत आहे तर रजत कपूर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसतोय.