Join us  

Success Story: कधीकाळी बँकेत 4000 रुपयांची नोकरी करायचा, आज झाला सर्वांचा लाडका 'बाघा'...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 6:59 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये बाघाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव तन्मय वेकारिया आहे. 2010 पासून तन्मय बाघाची भूमिका साकारत आहे.

आयुष्यात कुणाला लवकर तर कुणाला उशीरा पण मेहनतीचे फळ प्रत्येकाला मिळते. आयुष्यात संयम बाळगणे फार महत्वाचे आहे. आज समाजात अनेक प्रसिद्ध लोक आहेत, पण त्यांच्या प्रसिद्धीमागे त्यांचे अपार कष्ट दडलेले आहेत. आज आम्ही तुमच्याशी अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो एकेकाळी 4 हजार रुपयांची नोकरी करायचा. पण, आज तो घराघरात पोहोचला आहे.

सब टीव्हीवर येणारा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कार्यक्रम सर्वांनाच माहित आहे. 2008 मध्ये सुरू झालेला हा शो गेल्या 13 वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात घर केले आहे. आज आम्ही तुम्हाला याच प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये बाघाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाबद्दल सांगणार आहोत. गरिबीतून उठून आज तन्यने लोकांच्या हृदयात आपली छाप सोडली आहे. 

15 वर्षे गुजराती रंगभूमीवर काम केले

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये जेठालाल चंपकलाल गडाच्या दुकानात काम करणारा बाघा आज प्रेक्षकांचा आवडता आहे. बाघाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याचे खरे नाव तन्मय वेकारिया आहे. तन्मय हा गुजरातचा रहिवासी असून, त्याचे वडील अरविंद वेकारिया हेदेखील एक अभिनेते आहेत. त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. तन्मयनेही जवळपास 15 वर्षे गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.

बाघाचे पात्र मोठ्या कष्टाने साकारले

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशा परिस्थितीत लोकप्रिय शोमध्ये व्यक्तिरेखा मिळवणे तन्मयसाठी खूप अवघड गोष्ट होती. बाघाची भूमिका तन्मयला इतक्या सहजासहजी मिळाली नाही. यासाठी त्याने लाख प्रयत्न केले. बाघाच्या भूमिकेपूर्वी तन्मयने शोमध्ये चार व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ज्यामध्ये ऑटो ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, इन्स्पेक्टर आणि शिक्षक यांची भूमिका होती. यानंतर 2010 मध्ये तन्मयला बाघाची भूमिका देण्यात आली. तेव्हापासून तन्मयने बाघाच्या पात्रात जीव ओतला आणि तो प्रेक्षकांचा लाडका झाला.

तन्मय हा बँकेत सामान्य कर्मचारी होता

तन्मयच्या मागील आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, पूर्वी तो एका बँकेत कर्मचारी होता. तिथे तो मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असे. बँकेत काम करताना त्याला महिन्याकाठी फक्त 4 हजार रुपये पगार मिळत होता. पण तन्मयचे वडील अभिनेते होते, त्यामुळे तन्मयलाही अभिनेता बनण्याची आवड होती. यामुळेच तन्मयने हळूहळू अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. तो आपल्या वडिलांसोबत गुजरातच्या नाट्यक्षेत्रात उतरला आणि आज तो एक नावाजलेला अभिनेता आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा