दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे कित्येक मृत्यू होत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणेच मनोरंजन विश्वालाही याचा जोरदार धक्का बसला आहे. कोरोनामुळे अनेक सेलिब्रिटींना आपले जीव गमवावे लागले आहेत. आता मनोरंजन विश्वात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध तेलुगू निर्माते पोकुरी रामा राव यांनी शुक्रवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते. हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. ३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
पोकुरी रामा राव यांच्यावर दहा महिन्यांपूर्वी हृदयरोगाशी संबंधित एक शस्त्रक्रिया झाली होती. हैदराबादमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोकुरी रामा राव हे निर्माते पोकुरी बाबु राव यांचे भाऊ होते. त्यांच्या इथरन फिल्म्सअंतर्गत ‘रणम’, ‘ओंतरी’, ‘यज्ञम’ या चित्रपटांची निर्मिती झाली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहोचली आहे.