‘पद्मावत’ विरोधात देशभर तणाव! विरोधक आक्रमक ; पण शो हाऊसफुल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:06 AM
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ रिलीज होण्यास काही तास उरले असताना या चित्रपटाविरोधातील वातावरण तापू लागले आहे. या चित्रपटाच्या ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ रिलीज होण्यास काही तास उरले असताना या चित्रपटाविरोधातील वातावरण तापू लागले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोधत राजपूत संघटनांनी देशभर तीव्र आंदोलन उभारले असून ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळ सुरू आहे. मुंबई, नाशिकसह, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यात करणी सेनेचे समर्थक रस्त्यांवर उतरले आहेत. दिल्ली -जयपूर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला असून मथुरेत रेल रोकोचे वृत्त आहे. मुंबईत ‘पद्मावत’ विरोधात रस्त्यांवर उतरलेल्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त असून अहमदाबादेत ४० वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘पद्मावत’ला आमचा विरोध कायम असून हा चित्रपट रिलीज झालाच तर देशभर ‘जनता कर्फ्यु’सदृश स्थिती निर्माण करू, असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पद्मावत’ प्रदर्शित होत असलेल्या देशभरातील सर्व चित्रपटगृहांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशात अनेक राज्यांत स्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालय अलर्टवर आहे. सद्यस्थिती निपटण्यास राज्ये सक्षम आहेत. गरज पडली तर गृहमंत्रालय सरकारांची मदत करेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गुजरातेत आंदोलन हिंसक होण्याची चिन्हे बघता. येथील गुरूग्राम येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हरियाणाच्या कुरूक्षेत्र येथेही हे कलम लागू करण्यात आले आहे. राजस्थानात चित्तोडगड येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरियाणात ‘पद्मावत’वर अघोषित बंदीसारखी स्थिती आहे. करणी सेनेच्या धमकीपोटी ८० टक्के चित्रपट गृहांच्या मालकांनी ‘पद्मावत’ न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशननेही या चित्रपटावर बंदी लादली आहे.ALSO READ : ‘पद्मावत’ला विरोध : नाशिकच्या गंगापूर धरणावरील करणी सेनेचे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळले!२४०० रूपयांपर्यंत विकली गेलीत तिकिटेएकीकडे ‘पद्मावत’विरोधात देशातील वातावरण तापले असताना दुसरीकडे लोक हा चित्रपट पाहण्यासाठी कमालीचे उत्साहित दिसत आहेत. देशभरातील बहुतांश सर्वच चित्रपटगृहांतील ‘पद्मावत’चे सर्व शो हाऊसफुल आहेत. ‘पद्मावत’ पाहण्यासाठी लोक हजारो रूपये मोजायला तयार आहेत. तिकिटांच्या किमतींवरून हे लक्षात येते. दिल्लीच्या मल्टिप्लेक्स पीव्हीआरमध्ये प्लॅटिनम सुपीरियरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी २४०० रूपयांचे तिकिटे खरेदी केलीत. तर प्लॅटिनमसाठी २२०० रूपये मोजलेत.