बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. .या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सगळ्यांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळणार, बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील कोणत्या पैलूंवर या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असल्याने या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
ठाकरे या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरमध्ये नवाझ तंतोतंत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच दिसत असल्याचे प्रेक्षकांनी प्रतिक्रियांद्वारे सांगितले होते. ठाकरे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाविषयी एक खास घोषणा शिवसेनेचे नेते आणि या चित्रपटाचे लेखक संजय राऊत यांनी नुकतीच केली आहे.
ठाकरे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ठाकरे या चित्रपटाचा सिक्वल देखील बनवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी नुकतेच मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास केवळ एका चित्रपटाद्वारे दाखवणे कठीण आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाच्या सिक्वलचा देखील विचार केला असून त्यावर काम करायला देखील सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टींवर या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात येणार, त्यांच्या आयुष्यातील वादग्रस्त घटना देखील प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार का असे विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य म्हणजे एक खुले पुस्तक आहे. त्यांनी कधीच त्यांच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
ठाकरे या चित्रपटाची पटकथा ही संजय राऊत यांची असून ते गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले असून 23 जानेवारी 2019ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.