Join us

लेकाचा सिनेमा आपटला अन् बाबा भडकला! ‘Beast’वर संतापले थलापति विजयचे वडील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 6:21 PM

Thalapathy Vijay : सिनेमे फक्त स्टारडमच्या भरवशावर चालत नाहीत...,‘बीस्ट’च्या दिग्दर्शक व लेखकाला सुनावलं

तामिळ सुपरस्टार थलापति विजयचा (Thalapathy Vijay ) ‘बीस्ट’ (Beast) हा सिनेमा गेल्या 13 एप्रिलला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार हवा होती. पण प्रत्यक्षात रिलीज झाल्यावर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. विजयच्या चाहत्यांनी भलेही या चित्रपटाचं कौतुक केलं असलं तरी ‘बीस्ट’ला मिळालेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद पाहून एक व्यक्ती जाम संतापली आहे. ही व्यक्ती कोण तर खुद्द विजयचे वडील एस ए चंद्रशेखर.

विजयचे वडील आणि एस ए चंद्रशेखर साऊथचे बडे निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. लेकाच्या ‘बीस्ट’या सिनेमाकडून त्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण त्या फोल ठरल्यावर ते चांगलेच संतापले आहेत. केवळ स्टारडमच्या भरवश्यावर सिनेमे चालत नाहीत, असं त्यांनी  सुनावलं आहे.

एका ताज्या मुलाखतीत विजयच्या वडिलांनी ‘बीस्ट’वर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,  मेकर्स केवळ आणि केवळ विजयच्या स्टारडमवर फोकस करतात. पण फक्त स्टारडमच्या जोरावर सिनेमे चालत नसतात. आजचे तरूण दिग्दर्शक मोठा सुपरस्टार मिळाला की, स्क्रिनप्लेकडे दुर्लक्ष करतात. आपल्याकडे मोठा सुपरस्टार आहे. त्याच्या नावावर सिनेमा चालेल, या भ्रमात स्क्रीनप्लेसारख्या गोष्टींना ते विसरतात आणि काही चांगले फाईट सीन आणि काही चांगली गाणी घेऊन सिनेमा बनवतात. इथेच चूक होते, असं चंद्रशेखर म्हणाले.

दिग्दर्शकांना दिला सल्लाचंद्रशेखर यांनी ‘बीस्ट’चे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्यावरही टीका केली. दिग्दर्शकाने दहशतवादाच्या मुद्यावर होमवर्क केलं नव्हतं. दहशतवादासारखा संवेदनशील व मोठा मुद्दा तुम्ही इतक्या हलक्यात घेऊ शकत नाही. दिग्दर्शकाने अशा मुद्यांवर अभ्यास करायला हवा. रॉ एजंटचा अर्थ काय? ही संस्था कशी काम करते? हे दिग्दर्शकाला माहित असायला हवं. ‘बीस्ट’ हा सिनेमा केवळ म्युझिक डायरेक्टर, फाईट मास्टर, एडिटर व हिरोमुळे चालतोय, असं ते म्हणाले.‘बीस्ट’ या सिनेमात थलापति विजयने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींची कमाई केली आहे.

टॅग्स :Tollywood