‘बिग बॉस 13’च्या फिनालेची रात्र जवळ येतेय, तशी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. तोडीस तोड सेलिब्रिटी स्पर्धक, नव नवे नियम, लव्ह, रोमान्स आणि सोबतीला नको इतके वाद, भांडणं यामुळे बिग बॉसचे हे पर्व चांगलेच गाजले. पण आता ‘बिग बॉस’च्या घरातील भांडण आणि हिंसेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दुसरी कुणी नसून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आहे. लोकांना हिंसा बघताना इतकी मजा का येतेय? असा सवाल तिने केला आहे.
‘बिग बॉस’ हा शो हिंसक असल्याचे स्पष्ट मत तापसीने नोंदवले. यावर बोलताना ती म्हणाली की, लोकांना हिंसा पाहताना मजा का येते, हे मला कळत नाही. हे सगळे त्यांच्यासोबत झाले तर त्यांना अजिबात मजा येणार नाही. माझ्या मते, जोपर्यंत दुस-यासोबत घडते, तोपर्यंत मजा येते. स्वत:सोबत घडेल तेव्हा लोक बदलतील. अर्थात ही मानसिकता बदलायला बराच वेळ लागले. पण कुणीतरी याची सुरुवात तर करायला हवी.
नुकताच तापसीच्या ‘थप्पड’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘थप्पड’ ही कथा एका अशा मुलीची आहे. जी नव-याने तिच्या कानशीलात लगावल्याने त्याला घटस्फोट देऊ पाहते. ही भूमिका तापसीने साकारली आहे. तिच्या एका निर्णयामुळे तिच्या आयुष्यात काय काय बदल घडतात हे या सिनेमात दाखवले आहे.
मुल्क आणि आर्टिकल 15 सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘थप्पड’चे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची निर्मिती टी-सीरिज आणि बनारस मीडिया वर्क्स यांनी केली आहे. तापसीसोबतच या सिनेमात रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 28 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.