यामुळेच आमिर खानने रेखाबरोबर एकाही चित्रपटात केले नाही काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 12:08 PM
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान हे इंडस्ट्रीमधील दोन अशी नावे आहेत, ज्यांच्या यशस्वी करिअरची घोडदौड ...
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान हे इंडस्ट्रीमधील दोन अशी नावे आहेत, ज्यांच्या यशस्वी करिअरची घोडदौड अजूनही सुरू आहे. परंतु अशातही या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही हे विशेष. याचा अर्थ दोघांमध्ये वैर आहे, असेही नाही. हे दोघे एकमेकांना मित्र मानतात, शिवाय आदरही करतात. याचे उत्तम उदाहरण आपल्याला ‘दंगल’च्या स्क्रिनिंगवेळी बघावयास मिळाले. मात्र अशातही या दोघांनी एकत्र काम का केले नाही? याचाच उलगडा आज आम्ही करणार आहोत. ‘दंगल’ या चित्रपटावेळी रेखाने आमिर खानला एक पत्र लिहिले होते; पत्र वाचून आमिर ऐवढा इमोशनल झाला होता की, त्याच्या डोळ्यात अश्रू आले. या पत्राविषयी मीडियामध्ये बोलताना आमिरने म्हटले होते की, ‘हे पत्र मी कायम माझ्याजवळ ठेवणार आहे. पत्रात चित्रपटाचे कौतुक केले म्हणून नव्हे तर हे पत्र माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.’ पुढे रेखाही एका पार्टीत आल्या अन् त्यांनी आमिरचा हा चित्रपट माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे सांगितले. या दोघांचे हे भावनिक नाते बघून प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की, अखेर या दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम का केले नाही? असे म्हटले जाते की, आमिरने तेव्हाच रेखासोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली नव्हती. त्याचे झाले असे की, १९८० मध्ये आलेल्या ‘लॉकेट’ या चित्रपटात रेखा प्रमुख भूमिकेत होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खानचे वडील ताहिर हुसेन यांनी केले होती. त्यावेळी आमिर नेहमीच चित्रपटाच्या सेटवर जात असे. त्यामुळे त्याला रेखा यांना जवळून बघण्याचा योग आला होता. त्याचबरोबर जेव्हा त्याच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगली तेव्हा त्यानेच स्पष्ट केले होते की, आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या रेखाबरोबर काम करणार नाही. याच कारणामुळे रेखा आणि आमिरची जोडी कधीही प्रेक्षकांना पडद्यावर बघावयास मिळाली नाही.