सलमान आणि भाग्यश्रीचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट आठवतो आहे ना. या चित्रपटाने सलमान खान आणि भाग्यश्री रातोरात स्टार बनले. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे खूप कौतुक झाले. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटात दूधवाली गुलबिया ही व्यक्तिरेखा होती. जी अभिनेत्री हुमा खानने साकारली होती. पण ही अभिनेत्री सध्या कुठे आहे, याबद्दल काहीच माहिती नाही. या अभिनेत्रीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
हुमा खानने 'मैंने प्यार किया' नंतर सलमान खानच्या १९९९ मध्ये आलेल्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटातही काम केले. या चित्रपटात तिने आलोक नाथ यांच्या सेक्रेटरीची भूमिका केली होती. सलमान खानच्या या दोन चित्रपटात झळकल्यानंतर लोक हुमाला ओळखू लागले. सलमानच्या चित्रपटात काम करून आणि फिल्मी जगतात स्वत:चे नाव कमावल्यानंतरही हुमा आज विस्मृतीचे जीवन जगत आहे.
सी ग्रेड सिनेमातही केलं काम...
हुमा खानचा जन्म पाकिस्तानात झाला आणि ती तिथेच लहानाची मोठी वाढली. १९७० च्या दशकात ती पाकिस्तानी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. वयाच्या १७ व्या वर्षी ती आपल्या आईसोबत मुंबईत आली. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला, तिने एकाशी लग्न केले जो आधीच दोन मुलांचा बाप होता. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. हुमा खानने तिच्या करिअरमध्ये २० चित्रपटांमध्ये काम केले. सलमान खानशिवाय तिने अनिल कपूर आणि अमृता सिंग यांच्या 'चमेली की शादी' या चित्रपटातही काम केले होते. हुमाला साईड रोल्स जास्त मिळायचे. मुख्य प्रवाहातील चित्रपटात तिला विशेष ओळख निर्माण करता आली नाही. यामुळेच तिला सी-ग्रेड आणि हॉरर चित्रपटात काम करावे लागले.
३ वर्षांची झाली शिक्षा...
हुमा खानने रामसे ब्रदर्ससोबत 'खूनी रात', 'प्यार का देवता', 'कफन', 'खूनी मुर्डा' आणि 'जंवार' या चित्रपटांमध्ये काम केले. जरी हुमा खान साईड रोल करत होती. मात्र तिचे नाव नेहमीच चर्चेत असायचे. हुमा खानवर गंभीर आरोप असताना चित्रपट कारकीर्द चांगली चालली होती. हुमा खानवर १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला घरात ओलीस ठेवल्याचा आरोप होता. ती त्या मुलीला खूप मारहाण करत होती. हुमाने अनेक महिने त्या मुलीला सोबत ठेवले आणि तिला घरातील सर्व कामे करायला लावली. मात्र, या काळात ती मुलीच्या आईला महिन्याला १५०० रुपये पाठवत होती. २०१२ मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि ती दोषी आढळली. दोषी ठरल्यानंतर हुमा खानलाही ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणानंतर हुमा खान बॉलीवूडपासून दूर झाली मात्र, ही अभिनेत्री आता कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे हे कोणालाच माहित नाही.