२३ ऑगस्ट २०२३ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या दिवशी 'चांद्रयान-3'च्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रवावर अलगदपणे लँडिंग केलं. संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी हे लँडिंग झालं आणि भारताने इतिहास रचला. चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा भारत चौथा देश ठरला आहे. इतकंच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिल्याच देश ठरला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे चांद्रयान आणि इस्रोची चर्चा रंगली आहे. यामध्येच आता चांद्रयान आणि आदिपुरुष या दोघांची तुलना केली जात आहे. आदिपुरुषपेक्षा चांद्रयानचं बजेट कमी असल्यामुळे अनेकांनी आदिपुरुषला ट्रोल केलं आहे.
इस्त्रोने अत्यंत कमी खर्चात म्हणजेच जवळपास ६१५ कोटी रुपयांमध्ये 'चांद्रयान 3' ही मोहीम फत्ते करुन दाखवली आणि देशाचं नाव जगभरात गाजवलं. तर, दुसरीकडे आदिपुरुष या सिनेमासाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे हा सिनेमा आता ट्रोल होऊ लागला आहे.
काय म्हणाले ट्रोलर्स?
'आदिपुरुषचे ७०० कोटी रुपये इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना द्यायला हवे होते',असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'ही फार वाईट गोष्ट आहे की या सिनेमासाठी एवढे पैसे फुकट खर्च केले गेले', 'मुळात या कलाकारांना एवढं महत्त्व द्यायलाच नकोय. त्यांच्या जागी खऱ्या सुपरस्टार्सला, या शास्त्रज्ञांना महत्त्व आणि तितकीच सुरक्षा दिली गेली पाहिजे', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी या सिनेमाला ट्रोल केलं आहे.