मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात मुंबईतील अंधेरी येथील कोर्टाने समन्स जारी केले आहे. तसेच त्यांना २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २१ लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणामध्ये हे आदेश देण्यात आले आहेत.
एका व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी तिची बहिण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने हे समन्स बजावले आहे. या तिघींनी आपले २१ लाख रुपयांचे कर्ज थकवल्याचा आरोप सदर व्यावसायिकाने केला आहे. त्याची दखल घेत कोर्टाने शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार कथितपणे एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकांकडून शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात २१ लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. व्यावसायिकाने दावा केला की, शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी २१ रुपये उधार घेतले होते. तसेच २०१७ मध्ये व्याजासह या कर्जाची परतफेड करणे आवश्यक होते. तक्रारीतील उल्लेखानुसार शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता आणि आई सुनंदा ह्या या कर्जाची परतफेड करण्यामध्ये अपयशी ठरल्या. सुरेंद्र शेट्टी यांनी २०१५ मध्ये १८ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते.
दरम्यान, तक्रारकर्त्याने दावा केला आहे की, सुरेंद्र शेट्टी यांनी त्यांच्या मुली आणि पत्नीला या कर्जाची कल्पना दिली होती. मात्र या कर्जाची परतफेड करण्यापूर्वीच ११ ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर शिल्पा, शमिता आणि सुनंदा शेट्टी यांनी या कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला होता.