Join us

'द एलिफंट व्हिस्परर्स' मधील जोडप्याला पैसेच मिळाले नाहीत, म्हणाले, 'ऑस्करनंतर मेकर्सचं वागणं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 8:30 AM

फिल्म हिट झाल्यानंतर आमच्यासोबत दुर्व्यवहार केल्याचंही बोमन आणि बेली म्हणाले.

यंदाची ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) मधील बोमन आणि बेली हे जोडपं आठवत असेलच. हत्तींची आपल्या मुलांप्रमाणे सेवा करणाऱ्या या जोडप्याची कहाणी डॉक्युमेंटरीमध्ये टिपली होती. कार्तिकी गोन्साल्व्हिस (Kartiki Gonsalves) यांनी डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन केलं होतं तर गुनीत मोंगा (Guneet Monga) या निर्मात्या होत्या. ऑस्कर मिळाल्यानंतर हे जोडपं सर्वांनाच माहित झालं होतं. पण आता या जोडप्याने मेकर्सवर गंभीर आरोप केला आहे. काम झाल्यानंतर आमचे पैसेच न दिल्याचा आरोप बोमन आणि बेली यांनी केला आहे.

माध्यम रिपोर्टनुसार, बोमन आणि बेली यांनी सांगितले की डॉक्युमेंटरी शूटिंगदरम्यान कार्तिकी गोन्साल्व्हिस त्यांच्यासोबत खूप छान वागत होती. पण जसा ऑस्कर पुरस्कार मिळाला तिचं वागणं बदललं. मेकर्स त्यांच्यापासून दूर राहायला लागल्याचा दावा या जोडप्याने केला आहे. डॉक्युमेंटरीमध्ये लग्नाचा सीनचा जो खर्च आला ते पैसे खरंतर बेलीने नातीच्या शिक्षणासाठी वाचवून ठेवले होते. त्यांचे जवळपास १ लाख रुपये खर्च झाले होते. कार्तिकीने पैसे परत देऊ असं आश्वासन दिलं होतं पण अजूनही पैसे परत केले नाहीत. जेव्हा जेव्हा आम्ही फोन करतो व्यस्त असल्याचं सांगत ती फोन कट करते असंही हे कपल म्हणालं.

याशिवाय फिल्म हिट झाल्यानंतर आमच्यासोबत दुर्व्यवहार केल्याचंही बोमन आणि बेली म्हणाले. मुंबईतून कोइंम्बतूरला पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे नीलगिरीमध्ये आपल्या घरी जाण्यासाठीही पैसे नव्हते. यासाठीही कार्तिकीने त्यांची मदत केली नाही. गोन्साल्व्हिसने दावा केला की तिने पैसे परत दिलेत मात्र कपलच्या बँक खात्यात केवळ ६० रुपये होते. 

तमिळनाडूच्या नीलगिरी येथील थेप्पाकाडु हाथी शिबिरात अनाथ हत्तींची बोमन आणि बेली काळजी घेतात. फिल्म हिट झाल्यानंतर तमिळनाडू सरकारने त्यांना घर आणि १ लाख रुपयांची बक्षिसाची घोषणा केली होती. मात्र सरकारकडून कार्तिकीलाच बक्षिसाची रक्कम मिळाली.

टॅग्स :ऑस्करसिनेमासोशल मीडिया