विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याचा १४ फेब्रुवारी रोजी 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात बऱ्याच मराठी कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटात अभिनेता आशिष पाथोडे(Ashish Pathode)ने अंताजी यांची भूमिका साकारली आहे. नुकतेच एका मुलाखतीत आशिष छावा चित्रपटात काम करण्याचा अनुभव आणि किस्से सांगितले.
अभिनेता आशिष पाथोडे याने छावा सिनेमात अंताजी यांच्या अखेरच्या क्षणांच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, माझा (अंताजी) छावामध्ये मृत्यूदरम्यानचा जो सीक्वन्स आहे, ज्यात राजे ओरडतात. लक्ष्मण उतेकर सरांचं म्हणणं होतं की, सिनेमातील प्रत्येक जो मावळा किंवा योद्धा असेल त्याचा मृत्यू वीरेचीत (पराक्रमी) वाटला पाहिजे. ज्या पद्धतीने विकी कौशल त्या सीनमध्ये ओरडतो. माझ्या नावाने ज्या पद्धतीने आर्ततेने राजे हंबरडा फोडतात. सेटवरील सर्वांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. सगळा सेट सुन्न झाला होता त्या दिवशी. हे अंताजी यांच्या मार्फत जगायला मिळतंय, हे पूर्वजन्मी आपण काहीतरी चांगलं केलंय म्हणून या गोष्टी करायला मिळत आहेत. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. माझा गणपती बाप्पांवर खूप श्रद्धा आहे. तर मला वाटतं की बाप्पांनी अंताजीच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला आशीर्वाद दिला आहे.
'छावा'ने मोडला स्त्री २चा विक्रमट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, छावाने तिसऱ्या आठवड्यात दोन मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. स्त्री २ ने तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ७२.८३ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर बाहुबली २ने हिंदीमध्ये ६९.७५ कोटींची कमाई केली होती. छावाने या दोन चित्रपटांना मागे टाकले आहे. छावाने तिसऱ्या आठवड्यात ८४.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. छावाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत ४९६.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. छावाने जगभरातही चांगले कलेक्शन केले आहे.