नागराज मंजुळे ( Nagraj Manjule ) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा येत्या 4 मार्चला रिलीज होतोय. अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचंआमिर खानने (Aamir Khan) भरभरून कौतुक केलंय. पण याशिवायही या चित्रपटाचं आमिरचं चित्रपटाशी एक खास कनेक्शन आहे. होय, ‘झुंड’च्या निर्मात्या सविता राज हिरेमथ यांनी याबाबतचा खुलासा केला.
‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सविता यांनी ‘झुंड’ व आमिर खान यांच्यातील कनेक्शन सांगितलं. त्या म्हणाल्या, सत्यमेव जयते या शोमध्ये आमिरने नागपूरचे विजय बारसे यांच्यावर एक एपिसोड केला होता. तो एपिसोड पाहिल्यानंतरच विजय बारसे यांच्यावर चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली होती. 2015 मध्ये आम्ही विजय बरसे यांच्याकडून हक्क मिळवले. फिल्म नागपूरच्या पार्श्वभूमीवर बनणार होती. नागराज यांचा सैराट आणि फँड्री तोपर्यंत आला होता. त्यांची लोकप्रियता सगळेच जाणतात. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून नागराज हीच आमची पहिली पसंती होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत मात्र 2018 मध्ये चर्चा झाली. त्यांनी तोपर्यंत नागराज यांचा ‘सैराट’ पाहिला नव्हता. त्यांनी तो मागवून पाहिला. अमिताभ यांनी ‘झुंड’ची कथा आमिरकडूनच आधी ऐकली होती. आमिरनेही त्यांना हा सिनेमा तुम्ही करायला हवा, असं सुचवलं होतं. ‘झुंड’साठी आम्ही आमिरशी संपर्क साधला नव्हता. कारण ‘दंगल’मध्ये त्याने स्पोर्ट कोचची भूमिका आधीच केली होती.
अशी झाली टीनेज कलाकारांची कास्टिंग‘झुंड’या चित्रपटात अनेक अप्रशिक्षित बालकलाकार व टीनेज कलाकार आहेत. नागराज यांनी यासाठी ‘सैराट’ची पद्धत वापरली. पाच राज्यांत यासाठी आॅडिशन्स झालीत. काही कलाकार त्यांनी त्यांच्या आधीच्या चित्रपटातून घेतले. पण अन्य कलाकारांची पारख करताना नागराज यांनी खूप मेहनत घेतली. अगदी ते पश्चिम बंगालमध्येही गेले. कारण तिथे फुटबॉल सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आहे. पंजाबाही ते गेले. चित्रपटात डॉन नावाची भूमिका साकारणारा कलाकार नागपूरचा आहे.
कोण आहेत विजय बारसे?
'झुंड' ही एका निवृत्त क्रीडा शिक्षकाची कथा आहे, ज्यांची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे. हा शिक्षक झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध सॉकर खेळाडू बनवतो.विजय बारसे हे निवृत्त स्पोर्ट कोच आहेत. भारतासारख्या क्रिकेटप्रेमी देशात त्यांनी फुटबॉलला प्रोत्साहन दिलं. ते देखील चक्क झोपडपट्टीसारख्या भागात. नागपूर ही कर्मभूमी असलेल्या विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील अनेक मुलांना खेळाडू बनवलं. स्लम सॉकर नावाची एक चळवळ उभी केली. स्लम सॉकर अंतर्गत राज्यआणि राष्ट्रस्तरीय फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. वंचित मुलांना भर पावसात प्लास्टिकच्या बादलीचा वापर करून फुटबॉल खेळताना पाहिल्यानंतर स्लम सॉकर सुरू करण्याचा विचार मनात आल्याचं विजय यांनी सांगितलं आहे.