दिग्दर्शक आदित्य सरपोतदार(Aditya Sarpotdar)चा 'मुंज्या' (Munjya Movie) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय हा चित्रपट केवळ कथानकामुळेच पसंत केला जात आहे. दिग्दर्शकाला हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा 'कांतारा' मधून मिळाली. या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
आदित्य सरपोतदारने नुकतेच एका मुलाखतीत मुंज्या चित्रपट बनवण्याची प्रेरणा कांतारा सिनेमातून मिळाल्याचे सांगितले. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे, ज्यांच्या कथा कोकणात, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. अशा कथांवर चित्रपट का बनत नाहीत, असा प्रश्न मला लहानपणापासून असायचा. अशा लोककथेवर आधारित 'कांतारा' हा चित्रपट खूप गाजला. आपल्या महाराष्ट्रात आणि देशातील प्रत्येक प्रांतात अशा अनेक कथा आहेत. त्यांच्यावर चित्रपट बनवले तर विषयांची कमतरता भासणार नाही.
...तर सिनेमांसाठी कथांची कमतरता भासणार नाही
तो पुढे म्हणाला, हॉलिवूडमध्ये ५०-६० वर्षांत लिहिलेल्या पुस्तकांवर गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटरसारख्या मोठ्या मालिका बनवल्या गेल्या आहेत. शतकानुशतके टिकून राहणाऱ्या अशा कथा आपल्याजवळ आहेत. चित्रपटांसाठी कथांची कमतरता भासणार नाही.
आठवड्याभरात कमावले 'इतके' कोटीबॉक्स ऑफिसवर 'मुंज्या' चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी या सिनेमाने जवळपास ४ कोटींचा गल्ला जमवला होता. दोनच दिवसांत ११.२५ कोटींचा बिझनेस या सिनेमाने केला. आतादेखील या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.