'द काश्मीर फाइल्स'चे (The Kashmir Files) वादळ बॉक्स ऑफिसवर बघायला मिळत आहे. विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. एवढेच नाही, तर असे अनेक फोटो आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर येत आहेत, ज्यांत चित्रपट गृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांचे डोळे अश्रूंनी डबडब भरलेले दिसत आहेत.
अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर द काश्मीर फाइल्स चित्रपट हा केवळ हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला होता. मात्र, आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून हा चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे.
चार प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट - द बॉलीवुड हंगामाच्या एका वृत्तानुसार, या चित्रपटाचे यश पाहता, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट आणखी चार प्रादेशिक भाषांत डब करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, हा चित्रपट आता तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केला जाणार आहे. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट हिंदी भाषेत असल्याने पाहता येत नाही, अशा प्रेक्षकांसाठी ही गुडन्यूज आहे. यामुळे आता हा चित्रपट दक्षीण भारतीय प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे.
द काश्मीर फाइल्सचे कलेक्शन -भारतीय चित्रपटांच्या इतिहासात द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे नाव नोंदवले गेले आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर केवळ स्क्रीन्स वाढल्या नाहीत, तर कलेक्शनही दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटाने 9व्या दिवशी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 19.25 कोटी तर शनिवारी 24.80 कोटींची कमाई केली. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 141.25 कोटी रुपये झाले आहे.