‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरून पुन्हा एकदा रान माजलं आहे. विवेक अग्निहोत्रींनी (Vivek Agnihotri ) दिग्दर्शित केलेला हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याला कारण आहे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फीचे ज्युरी हेड नादव लापिड (Nadav Lapid) यांच्या एका वक्तव्यामुळे. होय, ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा वल्गर प्रोपगंडा फिल्म असल्याचं नादव लापिड म्हणाले आणि विवेक अग्निहोत्रींसह अनेकजण संतापले. आता तर विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असल्याची टिप्पणी करणाऱ्या नादव यांना थेट चॅलेंज केलं आहे.
होय, विवेक अग्निहोत्रींनी एक दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका करणाऱ्या नादव यांना चांगलंच सुनावलं आहे.
काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?गोव्यातील इफ्फी 2022 समारंभात एका ज्युरीने सांगितलं की ‘द काश्मीर फाइल्स’ हा एक वल्गर आणि अपप्रचार करणारा चित्रपट आहे. मित्रांनो, पण माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. कारण अशा सर्व गोष्टी दहशतवाद्यांचे समर्थक व भारताला तोडू इच्छिणाऱ्यांनी आधीही म्हटल्या आहेत. मला फक्त एकाच गोष्टीचं मोठे आर्श्चय वाटतंय की, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आणि भारत सरकारने आयोजित केलेल्या मंचावर अशा गोष्टी कशा बोलल्या जाऊ शकतात. मी हा चित्रपट तयार करण्याआधी स्वत: 700 लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. हे 700 लोक दुसरे तिसरे कोणी नसून या सर्वांसमोर त्यांच्या आई, वडील, बहीण, भावाचे तुकडे करण्यात आले होते. यांच्या आई आणि बहिणींवर सामूहिक बलात्कार झालेत आणि अशा चित्रपटाला तुम्ही प्रोपगंडा म्हणता ?
मी नादव लापिडला चॅलेंज करतो की, त्याने फक्त पुरावे द्यावेत. या चित्रपटातील एकही शॉट, एकही डायलॉग चुकीचा आहे, फक्त एवढं त्याने सिद्ध करावं. त्याने सिद्ध केलंच तर मी यानंतर कधीच चित्रपट तयार करणार नाही. मी चित्रपट बनवणंच बंद करेल. मी कुणाला घाबरणारा नाही. माझ्याविरोधात कितीही फतवे काढू देत, पण मी घाबरणारा नाही, असं विवेक अग्निहोत्रींनी व्हिडीओत म्हटलं आहे.