नवी दिल्ली-
'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. काश्मिरी पंडितांच्या व्यथा चित्रपटात प्रखरपणे मांडण्यात आल्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचत असल्यानं चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. 'द काश्मीर फाइल्स'चं दिग्दर्शन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. रिलीज झाल्यापासून, चित्रपटाला राजकारणापासून इतर गोष्टींपर्यंत अनेक वादांचा सामना देखील करावा लागत आहे. आता 'द कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत मोठा गौप्सस्फोट केला आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असं विवेक अग्नीहोत्री यांनी सांगितलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. याचा खुलासा विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे. विवेक अग्निहोत्रींनी नुकतंच बॉलिवूड हंगामा या इंग्रजी वेबसाइटशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दलही बरंच मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीत त्यांनी जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग देखील सांगितला आहे.
"मला धमक्या आल्या आहेत. अलीकडे, मी आणि माझी पत्नी ऑफिसमध्ये नसताना, दोन मुलं आमच्या ऑफिसमध्ये आली. एकच मॅनेजर आणि एक महिला ऑफीसमध्ये होती. मुलांनी तिला दरवाजातून ढकललं, ती खाली पडली, त्यांनी माझ्याबद्दल विचारलं आणि मग पळून गेले", असं विवेक अग्नहोत्री म्हणाले. "मी या घटनेबद्दल कधीही बोललो नाही, कारण अशा घटकांना प्रसिद्धी मिळावी अशी माझी इच्छा नव्हती. मी मॅनेजर आणि महिला कर्मचाऱ्याला सुरक्षेची काळजी करू नका असं आश्वासन दिलं आहे", असंही ते म्हणाले.
'द काश्मीर फाइल्स' चित्रपटानं आतापर्यंत 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर 'द काश्मीर फाईल्स' हा 2020 आणि 2021 मध्ये कोरोना व्हायरस महामारीच्या काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटानं कोरोना काळात सर्वाधिक कमाई केली होती. आता सूर्यवंशी दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.