महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रीय आहे. याशिवाय मुंबईलाही पावसाने चांगलंच झोडपलं आहे. मुंबईकरांना या पावसात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे खड्डे. अनेकदा खड्ड्यात पडून लोकांना दुखापती होतात. काही जणांचा जीव गेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. याच खड्ड्यांवर 'द काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्रींनी जोरदार टीका करत ट्विट केलं आहे.
मुंबईतील खड्ड्यांवर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या ट्विटमध्ये BMC ला टॅग केलं आणि म्हणाले की, "जर गाड्यांना खड्ड्यांपासून वाचवायचं असेल तर माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. मुंबई नगर निगम यांनी प्रत्येक खड्ड्याच्या शेजारी एक साईनबोर्ड लावावा. त्या बोर्डवर खड्डा किती खोलीचा आहे हे सांगावं. म्हणजे हा साईनबोर्ड वाचून ड्रायव्हर त्या दृष्टीने विचार करत खड्ड्यांमधून गाडी चालवेल."
विवेक अग्निहोत्रींनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया
विवेक अग्निहोत्रींनी जे ट्विट केलंय त्यावर लोकांनी खास प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ट्विट करुन सांगितलंय की, "पावसाचं पाणी खड्ड्यात गोळा करण्याचं चांगलं काम बीएमसी करत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे." याशिवाय आणखी एका युजरने कमेंट केलीय की, "याच खड्डयांमुळे लोकांनी आपल्या परिवारातील सदस्यांना गमावलंय, हे आपण विसरता कामा नये." विवेक अग्निहोत्रींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी 'द काश्मिर फाईल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' अशा सिनेमांमधून ज्वलंत वास्तववादी विषय समोर आणले.