The Kashmir Files row: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट रिलीज होऊन महिना झाला. पण अद्यापही या चित्रपटाची चर्चा थांबलेली नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केलीच. पण राजकीय गोटातही या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. काहींनी चित्रपटाचं समर्थन केलं. तर काहींनी चित्रपटाविरोधात टीकेचा सूर लावला. तूर्तास चर्चा आहे ती बॉलिवूड सिंगर सोनू निगमच्या वक्तव्याची. नुकतीच सोनू निगमने (Sonu Nigam) ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचाही उल्लेख झाला आणि यावरून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते भडकले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात सोनू निगमने केलेलं वक्तव्य अपमानास्पद असल्याचा दावा करत, आम आदमी पार्टीने त्याच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
आम आदमी पार्टी कार्यकारणी सदस्य प्रीती शर्मा- मेनन यांनी सोनू निगमला पत्र लिहून द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याची ताकिद दिली. संगीतकार सोनू निगमने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काश्मिरी पंडितांची थट्टा केल्याचा आरोप केला आहे. हे गैर असून आम आदमी पार्टी त्याचा निषेध करते. यासाठी सोनू निगमने केजरीवाल यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संगीतकार सोनू निगम यांनी अरविंद केजरीवाल यांना चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला आहे. पण मुख्यमंत्र्यांचे काम प्रशासन चालवणं आहे आणि तुमचं काम फक्त लोकांचं मनोरंजन करणं आहे. तेव्हा तुम्ही तेच करा, असं आम आदमी पार्टीच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
काय म्हणाला सोनू निगम?काही दिवसांआधी अरविंद केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका केली होती. चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा युट्यूबवरच अपलोड करावा, असं केजरीवाल म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर सोनू निगमने अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं. तुम्ही ‘द काश्मीर फाइल्स’ला खोटा चित्रपट कसं म्हणू शकता? तुम्ही काश्मिरी पंडितांची खिल्ली उडवू शकत नाही. काश्मिरी पंडितांचा नरसंहार झाला, हे अख्ख्या जगाला माहित आहे. तुम्ही पंजाब जिंकलं आहे, तेव्हा पंजाब फाइल्स बनवा. पण राजकारण करू नका. एकीकडे तुम्ही नरसंहार झाला असं म्हणता आणि दुसरीकडे विधानसभेत हा चित्रपट खोटा असल्याचं म्हणता. हा काश्मिरी पंडितांचा अनादर आहे, असं सोनू एका मुलाखतीत म्हणाला.