'द केरळ स्टोरी' सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कुठे बंदी तर कुठे विरोध असूनही सिनेमा छप्परफाड कमाई करतोय. पहिल्याच विकेंडला सिनेमाच्या कमाईत ३० टक्के वाढ झाली. तर सोमवारच्या दिवशीही प्रेक्षकांची गर्दी थिएटरमध्ये दिसून आली. सोमवारच्या 'वर्किंग डे'लाही सिनेमाने १५ कोटींचा गल्ला जमवला. तर गेल्या ४ दिवसात सिनेमाने ४६ कोटींची कमाई केली आहे.
दीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या वादग्रस्त ‘द केरळ स्टोरी’बाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल होतं. काही ठिकाणी पहिल्या दिवशी चोख पोलिस बंदोबस्तामध्ये सिनेमाचे शो दाखवले गेल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रेक्षकांची गर्दी वाढू लागल्याचं समोर आलेल्या आकड्यांवरून समजतं. शुक्रवारी या चित्रपटाने ८.०३ कोटी रुपयांचा व्यवसाय करत बॅाक्स ऑफिसवर खातं उघडलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाच्या व्यवसायात ३९.७३ टक्के वाढ झाल्याने ११.२२ कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला. रविवारी ४२.६० टक्के वाढ झाल्याने ‘द केरळ स्टोरी’चा बिझनेस १६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने ३५.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनापूर्वी निर्माण झालेला वाद आणि चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी गर्दी उसळत असल्याचं चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसांत सिनेमा १०० कोटी पार करेल अशी शक्यता ट्रेड अॅनालिस्टने वर्तवली आहे.
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा ३ मुलींची कथा आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि धर्मबदल केला जातो. यानंतर त्यांना ISIS च्या हवाली केलं जातं. दरम्यान एक मुलगी निसटून भारतात येते आणि घडलेली सर्व घटना सांगते. त्या मुलीचं पात्र अभिनेत्री अदा शर्माने साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय.
योगी सरकारचा मोठा निर्णय
दुसरीकडे तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. तर नुकतंच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. पंतप्रधान मोदींनीही सिनेमाचं कौतुक केलं आहे.