'द केरला स्टोरी' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने अनेक वाद ओढवून घेतले. तरीही बॉक्स ऑफीसवर सिनेमाने चांगली केली. 'द केरला स्टोरी' सिनेमा अनेक कालावधीनंतर झी 5 या ओटीटीवर रिलीज झाला. परंतु पुन्हा एकदा 'द केरला स्टोरी' सिनेमाने नवीन वाद ओढवून घेतलाय. लवकरच हा सिनेमा दूरदर्शनवर रिलीज होणार होता. पण केरळच्या मुख्यमंत्र्यांनीच या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केलीय. नेमकं प्रकरण काय?
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विटरवर पोस्ट करुन 'द केरला स्टोरी'चं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केलीय. विजयन यांनी पोस्ट लिहिलीय की, "द केरला स्टोरी सिनेमा प्रोपागंडा विचारांना वाढीस देण्याचं काम करतोय. त्यामुळे दूरदर्शनच्या माध्यमातून द केरला स्टोरीचं होत असलेलं प्रसारण निंदनीय आहे. एखादं राष्ट्रीय चॅनल BJP-RSS चं प्रचारक म्हणून काम करु शकत नाही."
मुख्यमंत्री पिनाराई पुढे लिहितात, "सध्या निवडणुकींच्या काळात अशा सिनेमाचं प्रसारण होणं चुकीचं आहे. या सिनेमामुळे धार्मिक मतभेद वाढीस लागू शकतात." त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 'द केरला स्टोरी' चं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केलीय. 'द केरला स्टोरी' सिनेमा आज ५ एप्रिलला शुक्रवारी ८ वाजता DD National वर प्रसारित होणार आहे. आता स्वतः केरळच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केल्याने 'द केरला स्टोरी' दूरदर्शनवर लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.