The Kerala Story Ban In West Bengal: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि इतर संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण, अखेर शुक्रवारी(दि.5) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यानंतर तमिळनाडूमध्ये मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपटाचे शो रद्द केले. यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे.
एकीकडे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांतून या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. यातच आता पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर बंदी घातली आहे. या चित्रपटाबाबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच ही कारवाई केली आहे.
पश्चिम बंगाल सरकारने निर्णय घेतला आहे की 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट बंगालमधील सर्व चित्रपटगृहांमधून हटवला जाईल आणि हा चित्रपट कुठेही चालू दिला जाणार नाही. द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी सरकार खपवून घेणार नाही. शांतता राखण्यासाठी या राज्यात केरळ स्टोरीवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आहे.
पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान विपुलने म्हटले आहे की- बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू. जिथे भाजपचे सरकार नाही तिथे सरकार आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे असे नाही. केरळप्रमाणे भाजपचे सरकार नसलेल्या अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट सुरू आहे. अधिकाधिक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करावा अशी आमची इच्छा आहे.