मुंबई - 'कुछ कुछ होता है' हा भारतीय सिने विश्वातील आयकॉनिक सिनेमा प्रदर्शित झाल्यास २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा आनंद रसिकांसोबत शेअर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शोची तिकिटे अवघ्या २५ मिनिटांच्या आत विकली गेली. त्यामुळे आजही 'कुछ कुछ होता है'ची क्रेझ आजही आहे.
शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या त्रिकोणी प्रेमकथेवर आधारलेला 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. यंदा या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने 'कुछ कुछ होता है'चा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी रविवारी, १५ ऑक्टोबरला या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित केले जाणार असल्याचे प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हँडलने काही तासांपूर्वी जाहीर करत बुकिंग सुरू केले.
त्यानंतर काही वेळातच या शोच्या सर्व तिकिट्स विकल्या गेल्या. २५वा वर्धापन दिन असल्याने तिकिटांची किंमत २५ रुपये ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे २५चा आकडा न ओलांडता 'कुछ कुछ होता है'च्या विशेष शोच्या सर्व तिकिटांची विक्री २५ मिनिटांच्या झाली. वर्सोवा येथील पीव्हीआर सिनेमागृहात हा शो होणार आहे. एखाद्या सिनेमाच्या पुर्नप्रदर्शनाला २५ वर्षांनीही इतका प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जात असून, 'कुछ कुछ होता है'ची क्रेझ आजही कायम असल्याचे दर्शवणारे हे चित्र आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.