'यारों दोस्ती', 'जरा सी दिल में दे जगह तू', 'हम रहें या न रहें कल' अशा कितीतरी गाण्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला तारुण्यात घेऊन जाणारा प्रसिद्ध गायक केके (KK) याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या गायकाच्या निधनामुळे साऱ्यांनाच जबर धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या जवळच्या व्यक्ती त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच त्याचं गाजलेलं यारों दोस्ती बडी ही हसीन है या गाण्याची चर्चा रंगली आहे. हे गाणं KK ने एका खास मैत्रिणीसाठी तयार केलं होतं.
KK च्या निधनानंतर त्याचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात 'द कपिल शर्मा' या रिअॅलिटी शोमधील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या भागात केके ने हजेरी लावत त्याच्या संगीतमय प्रवासाविषयी भाष्य केलं होतं. याच काळात त्याने यारों दोस्ती हे गाणं तयार करण्याचा मागचा किस्सा सांगितला.
KK यांनी हे खास गाणं त्यांच्या पत्नीसाठी ज्योतीसाठी तयार रचलं होतं. ज्योती आणि KK शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. ६वी च्या वर्गात असताना या दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न केलं. त्यामुळे मैत्री ते प्रेम हा प्रवास किती सुंदर असतो हे वर्णन करणारं गाणं त्यांनी तयार केलं होतं.
"ज्योती आणि मी ६ वीत असल्यापासून एकमेकांना ओळखायचो. आधी मैत्री झाली मग त्यानंतर प्रेम. हा प्रवास खूप सुंदर होता", त्यामुळे मी ते गाणं लिहिलं.
दरम्यान, केके यांचं खरं नाव कृष्णकुमार कुन्नथ असं होतं. मात्र, दिल्लीमध्ये त्यांना केके याच टोपणनावाने ओळखलं जायचं. पुढे हेच नाव त्यांनी कलाविश्वातही वापरण्यास सुरुवात केली. आणि पाहता पाहता हे नाव घराघरात पोहोचलं.