Join us

आमिर खानच्या 'गजनी' सिनेमातील खलनायक बॉलिवूडमधून आहे गायब, साउथच्या सिनेमात करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 4:33 PM

२००८ साली रिलीज झालेला आमिर खान(Aamir Khan)चा चित्रपट 'गजनी'(Ghajini)ने १०० कोटींचा आकडा पार करणारा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशात आमिर खानशिवाय 'गजनी धर्मात्मा'ची भूमिका साकारणाऱ्या प्रदीप रावत (Pradip Rawat) यांचाही मोलाचा वाटा होता.

२००८ साली रिलीज झालेला आमिर खान(Aamir Khan)चा चित्रपट 'गजनी'(Ghajini)ने १०० कोटींचा आकडा पार करणारा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशात आमिर खानशिवाय 'गजनी धर्मात्मा'ची भूमिका साकारणाऱ्या प्रदीप रावत (Pradip Rawat) यांचाही मोलाचा वाटा होता. प्रदीप रावत बऱ्याच मोठ्या कालावधीपासून हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेले नाहीत. गजनीला मिळालेल्या यशानंतर प्रदीप रावत यांना खूप लोकप्रियता मिळाली. ते साउथ सिनेइंडस्ट्रीतही खूप प्रसिद्ध आहेत. 

प्रदीप रावत हे मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे आहेत. प्रदीप यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण त्याची उंची पाहून बीआर चोप्रा यांनी लोकप्रिय मालिका महाभारतमध्ये त्यांना अश्वत्थामाची भूमिका दिली. यानंतर प्रदीप यांना छोट्या बजेटच्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळू लागल्या. त्यात त्यांना यश न मिळाल्यामुळे त्यांनी सहायक भूमिका करण्याचा निर्णय घेतला.

'ऐतबार' चित्रपटात प्रदीप रावत यांनी पोलिसाची भूमिका केली होती. याशिवाय 'अग्निपथ', 'बागी', 'कोयला', 'मेजर साब', 'सरफरोश' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले पण त्यातून फारशी काही ओळख मिळाली नाही. 'लगान' चित्रपटातून प्रदीप रावत यांचे आयुष्य बदलले आणि ओळख मिळाली. या चित्रपटातील देवा सिंग सोढीच्या भूमिकेसाठी ते पहिली पसंती नसले तरी काही कारणास्तव ज्याला कास्ट करण्यात आले होते तो ही भूमिका करू शकला नाही. त्यामुळे प्रदीप यांना हा रोल मिळाला. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

बॉलिवूडनंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे वळवला. एसएस राजामौली 'सई' चित्रपट बनवणार होते. या चित्रपटातील खलनायकासाठी एका जबरदस्त पात्राची गरज होती. राजामौली यांच्या सहाय्यकाने प्रदीप यांचे नाव सुचवले आणि या चित्रपटाच्या यशाने इतिहास रचला. प्रदीप रावत हे 'गजनी'साठी ओळखले जातात पण साऊथ इंडस्ट्रीत ते आजही 'सई'मधील खलनायकासाठी ओळखले जातात.  प्रदीप रावत शेवटचे 'सिंग इज ब्लिंग'मध्ये २०१५ साली दिसले होते. त्यानंतर ते बॉलिवूडमध्ये दिसले नाही. पण त्यांनी ५० हून अधिक तेलुगू आणि तमीळ, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि दक्षिण सिनेइंडस्ट्रीत त्यांनी जम बसवला आहे. 

टॅग्स :आमिर खान