शाहरुख खान(Shah Rukh Khan)ला बॉलिवूडचा बादशाह संबोधले जाते. आज या बॉलिवूडच्या बादशाहला भारतीय सिनेसृष्टीत आणि एण्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरूख खानचा पहिला सिनेमा दीवाना २५ जून, १९९२ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत असले, तरी सर्वाधिक चर्चेत असलेले पदार्पण अभिनेता शाहरुख खानचं होते. पहिल्याच चित्रपटातच त्याने लोकांना वेड लावत त्यांच्या मनात घर केले. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास केलेला शाहरुख आज इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक आहे. 'बाजीगर' आणि 'डर' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून त्याने स्वत:ला सिद्ध केले आणि त्यानंतर कोणताही अभिनेता त्याला रोखू शकला नाही. त्याच्या कारकीर्दीला ३० वर्षे झाल्याच्या निमित्ताने आज त्याचा बहुचर्चित चित्रपट पठान(Pathaan)मधील लूक रिलीज करण्यात आला आहे.
शाहरूख खानने इंस्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करत लिहिले की, ३० वर्षे आणि पुढे मोजू शकलो नाही कारण तुमचे प्रेम आणि स्मित असीम आहे. ही कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी घेऊन येत आहे पठाण. २५ जानेवारी २०२३ रोजी यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला पठाण भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे.
आज रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये शाहरुख दमदार लूकमध्ये दिसत आहे जो एका धोकादायक मिशनसाठी सज्ज आहे. इंटरनेटवर येताच तिच्या या लूकने खळबळ उडवून दिली आहे. पठाणच्या रुपात शाहरुखचा लूक खूपच प्रभावी दिसत आहे. शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर झळकला नाही आणि आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. शाहरुख खान शेवटचा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या झिरो या चित्रपटात दिसला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळेच शाहरुखने आपल्या पुनरागमनासाठी जबरदस्त प्लॅन केला आहे.