अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अमिताभ बच्चन, आलिया भट, रणबीर कपूर, अनुपम खेर, रजनीकांत, कंगना राणौत, कतरिना कैफ, विकी कौशल, सोनू निगम, रोहित शेट्टी आणि अभिषेक कुमारसोबत अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यादरम्यान विनोदवीर राजीव निगम(Rajeev Nigam)ने सेलिब्रेटींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
राजीव निगमने कलाकारांचा जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, त्यात पाहायला मिळतंय की, सुरूवातीला आमिर खान दिसतो आहे, जो म्हणतोय की, धर्मांच्या नावावर लोक खूप गुन्हे करतात. कोणता देव किंवा अल्लाह त्यांचा हा गुन्हा माफ करेल का? त्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणतो की, जेव्ही आम्ही भारतासाठी खेळतो तेव्हा एक टीम म्हणून खेळतो. मैदानात तुम्ही हिंदू आहात की मुसलमान या गोष्टीला महत्त्व नसते. मी सचिन तेंडुलकर आहे आणि सर्वात पहिले मी भारतीय आहे.
त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात की, एका हिंदुस्तानीवर अन्याय म्हणजे सर्व हिंदुस्तानींवर अन्याय आहे. व्हिडीओत अनुपम खेर, शबाना आझमी, तबला वादक झाकीर हुसैन, अभिषेक बच्चन, तब्बू सोबत साऊथचे कलाकार यात पाहायला मिळत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही पहिले हिंदुस्तानी आहोत. शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात की, हिंदुस्तानींवर अन्याय म्हणजे सर्व देशावर अन्याय आहे. थांबवा हा अनर्थ. आपण एकमेकांसोबत असे कसे करु शकतो?
कॉमेडियन म्हणाला...राजीव निगमने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा जुना व्हिडीओ, तेव्हा देशात किती द्वेष होता. देशातील सचिन आणि बच्चन यांच्यासारख्या लोकांना समोर येऊन संदेश द्यावा लागत होता. आता हे लोक असे संदेश देताना दिसतात का? याचा अर्थ स्पष्ट आहे की, आता देशात शांती आणि रामराज्य आलेले आहे. आता सेलिब्रेटी लोकांना समोर येण्याची गरज नाही. जय श्री राम.