‘सरकार ३’ च्या टीझरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2016 9:18 PM
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या अमिताभ बच्चन अभिनीत आगामी ‘सरकार ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर शुक्रवारी २३ डिसेंबरला प्रदर्शित ...
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या अमिताभ बच्चन अभिनीत आगामी ‘सरकार ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर शुक्रवारी २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. ‘सरकार’ या चित्रपटाची कथा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. २००५ साली राम गोपाल वर्माचा ‘सरकार’ सिनेमा रिलीज करण्यात आला होता. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सुभाष नागरे ही भूमिका साकारली होती. अमिताभ यांनी साकारलेली भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्वाशी मिळती-जुळती होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाचा दुसरा भागा २००८ साली ‘सरकार राज’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला. यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. यातही अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असून त्याच्यासोबत मनोज वाजपेयी, यामी गौतम, जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ मार्च २०१७ ला रिलीज होणार आहे. २३ डिसेंबरला आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘दंगल’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. यासोबतच ‘सरकार ३’ या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मदिन आहे. यामुळे राम गोपाल वर्मा यांनी २३ तारीख निवडली असल्याचे सांगण्यात येते. बाळासाहेबांच्या चाहत्यांसाठी ‘सरकार ३’चा टिझर उत्सुकता वाढविणारा ठरणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. गुन्हे जगत व भूत प्रेतांच्या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले राम गोपाल वर्मा यांनी ‘सरकार’मधून राजकारणावर प्रकाश टाकला होता तर जयललिता यांच्या जीवनावर ते शशिकला हा चित्रपट तयार करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.