दिव्या भारतीच्या निधनानंतर स्टारडस्ट मासिकाचे पत्रकार ट्रॉय रिबेरियो यांनी एक लेख लिहिला होता. त्या दिवशी काय काय घडले हे सगळे त्यांनी त्यात नमूद केले होते. त्यांनी लेखात लिहिले होते की, दिव्या, फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचे पती डॉ. श्याम लुल्ला दिव्याच्या घरी होते. दिव्याने प्रचंड दारू प्यायली होती. तिच्या घराच्या बाल्कनीत बसायला तिला खूप आवडत असे. नेहमीप्रमाणेच ती बाल्कनीत बसली होती. पण दारूच्या नशेत असल्याने दिव्याचा तोल गेला आणि ती बाल्कनीतून खाली पडली.
दिव्याला लगेचच श्याम लुल्ला आणि दिव्याच्या बिल्डिंगमध्ये राहाणारे दिग्दर्शक व्ही मेनन कूपर रुग्णालयात घेऊन गेले तर नीता आणि दिव्याच्या घरात काम करणारी बाई दिव्याच्या घरी ही गोष्ट सांगायला गेली. दिव्याचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. पण तिला वाचवण्यात अपयश आले. ही बातमी त्यावेळी इंडस्ट्रीत पसरली नसल्याने रुग्णालयात केवळ काहीच लोक उपस्थित होते. दिव्याच्या निधनाचा धक्का तिच्या कुटुंबियांना बसला होता. तिच्या प्रेताच्या बाजूला तिचे वडील उभे राहून एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडत होते. माझी मुलगी मला परत करा... असे ते सतत म्हणत होते. त्यांना सांभाळणे खूपच कठिण झाले होते. त्यांच्यासोबत दिव्याचा भाऊ उपस्थित होता. दिव्या आज खूपच डिप्रेस होती. ती बाल्कनीतून पडण्याच्या दहा मिनिटे आधीपर्यंत मी तिच्यासोबतच होतो. पण असे काही घडेल असे मला वाटले देखील नव्हते असे तिचा भाऊ कुणाल म्हणत होता. तिची आई कुठे गेली कोणालाच माहीत नव्हते. रात्री पावणे चारच्या सुमारास तिची आई तिथे आली. तिथे येईपर्यंत काय घडले याविषयी तिला काहीच माहीत नव्हते. आल्यानंतर तिला ही बातमी कळली. हे केवळ तुझ्यामुळेच घडले असे दिव्याचे वडील आणि भाऊ तिला सुनावत होते. पण ती त्यावर काहीच बोलली नाही. केवळ दिव्याच्या प्रेताकडे ती गेली आणि काहीच वेळात ती दिव्याच्या मामासोबत रुग्णालयातून निघून गेली.
यानंतर तासाभरानंतर साजिद तिथे आला. दिव्याचे निधन झाले हे त्याला सहनच होत नव्हते. तो खाली कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना तो सतत सांगत होता की, तुम्ही काहीही करा... पण माझ्या पत्नीला परत आणा.
दिव्याची बातमी इंडस्ट्रीतील लोकांना कळल्यावर पंकज निहलानी पत्नी, मुलगा आणि निर्माते राजू मवानीसोबत तिथे आले. दिव्याच्या वडिलांची तब्येत तोपर्यंत पूर्णपणे ढासळली होती. त्यांना सायकॅट्रिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची काळजी पंकज घेत होते. त्यानंतर काहीच वेळात मोरानी ब्रदर्स आपल्या पत्नीसमवेत तिथे आले. थोड्याच वेळात बोनी कपूर, गोविंदा, दिव्याची सेक्रेटरी ज्योती, निर्माते राहुल गुप्ता, सुनील सैनी, संजय कपूर, सैफ अली खान, कमल सदनाद असे इंडस्ट्रीतील लोक रुग्णालयात जमा व्हायला लागले.
सकाळी सहाच्या दरम्यान दिव्याचे प्रेत पोस्टमॉटर्मसाठी नेण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता तिच्या कुटुंबियांनी प्रेत ताब्यात घेतले आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. दिव्याचे अंत्यसंस्कार कोणत्या रितीरिवाजाप्रमाणे करायचे यासाठी साजिद आणि दिव्याच्या आईमध्ये चांगलाच वाद रंगला होता. दिव्याने साजिदसाठी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे तिचे अंत्यविधी इस्लाम धर्माप्रमाणे केले जावे असे तो दिव्याच्या कुटुंबियांना सांगत होता. पण अखेरीस हिंदू रितीरिवाजाप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिव्याला एखाद्या वधूप्रमाणे सजवण्यात आले होते.
दिव्याने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केले असले तरी नितीन मनमोहन वगळता कोणीच त्या दिवशी आपले चित्रीकरण रद्द केले नव्हते. दिव्याच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर जितेंद्र यांनी त्याच दिवशी त्यांच्या घरी एक मोठी पार्टी दिली होती.
दिव्याच्या घरात उपस्थित असलेल्या नीताने पोलिसांना सांगितले होते की, दिव्या बाल्कनीतून पडली की तिने उडी मारली हे आम्हाला माहीत नाही. कारण ती घटना काही सेकंदात घडली. दिव्याच्या एका मैत्रिणीने स्टारडस्टशी बोलताना सांगितले होते की, दिव्या त्या दिवशी खूपच उदास होती. त्यामुळे तिने चित्रीकरणासाठी हैद्राबादला जाणे रद्द केले होते. तिने साजिद आणि तिच्यासाठी नवीन घर घेतले होते आणि घरासाठी शॉपिंग करण्यासाठी ती संध्याकाळी बाहेर गेली होती. त्यानंतर ती एका मैत्रिणीच्या पार्टीत गेली होती. पण तिचे आणि साजिदचे कडाक्याचे भांडण झाल्याने ती अतिशय चिडलेल्या अवस्थेतच घरी परतली होती. साजिदला एका डिस्ट्रीब्युटरला भेटायला लोखंडवाला येथे जायचे होते. त्यामुळे तो जायला निघाला होता. पण तू दहा मिनिटांत परत आला नाहीस तर माझे तोंड कधीच पाहू शकणार नाहीस असे दिव्याने साजिदला सुनावले होते. पण साजिदने दिव्याच्या या धमकीकडे दुर्लक्ष केले. दिव्या दारूच्या नशेत असल्याने तिने बाल्कनीत बसू नये असे तिला नीता सतत सांगत होती. पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती.
दिव्याच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी आजही अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.