बॉलिवूडमध्ये (Bollywood) अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्या. अशीच एक अभिनेत्री वादळासारखी आली आणि इंडस्ट्रीवर तिची जादू चालली. पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं. ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक झाली होती आणि अशातच अचानक तिने इंडस्ट्री सोडली. आपल्या काही वर्षांच्या करिअरमध्ये ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाली. या अभिनेत्रीचं नाव आहे सोनम (Actress Sonam).
९०च्या दशकात सोनम खूप लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आणि बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्ससोबत सिनेमे केले. तिच्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांवर जणू जादूच केली होती. एकेकाळी तिला सिनेमासाठी साइन करण्यासाठी तिच्याकडे लाइन लागत होती. कमी वयातच 'विजय' सिनेमातून सुरूवात करणाऱ्या सोनमने 'त्रिदेव', 'विश्वात्मा', 'मिट्टी और सोना', 'अजूबा', 'कोहराम', 'क्रोध' सारख्या सिनेमात काम केलं.
१९९१ मध्ये जेव्हा तिचं करिअर शिखरावर होतं तेव्हा तिने निर्माता राजीव रायसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर सोनमने बॉलिवूड इंडस्ट्री सोडली आणि परदेशात स्थायीक झाली. राजीव रायसोबत १० वर्ष संसार केल्यावर ते वेगळे झाले. पण राजीवसोबत तिचा घटस्फोट लग्नाच्या २५ वर्षांनी म्हणजे २०१६ मध्ये झाला.
राजीव आणि सोनमला एक मुलगा आहे. यानंतर सोनम पुन्हा एकदा प्रेमात पडली. तिने घटस्फोटानंतर दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनमने २०१७ मध्ये वयाच्या ४४व्या वर्षी आपला मित्र डॉ. मुरली पोडुवलसोबत लग्न केलं. यावेळी तिचा मुलगा २३ वर्षांचा झाला होता.
सोनम आता अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आपला पती आणि परिवारासोबत जीवन जगत आहे. सोशल मीडियावर ती फार अॅक्टिव नाही. तसं तर सोनमचं खरं नाव बख्तावर खान आहे. ती बॉलिवूडचे प्रसिद्ध व्हिलन रजा मुराद यांनी भाची लागते.
आपल्या करिअरच्या शिखरावर असताना सोनमला अंडरवर्ल्डमधून धमक्या मिळू लागल्या होत्या. त्यानंतर तिने परदेशात जाऊन सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. त्रिदेव सिनेमातील तिचं नसीरूद्दीन शाह यांच्यासोबतचं ओए ओए गाणं फार गाजलं होतं. त्यानंतर तिला ओए ओए गर्ल म्हणून ओळखलं जात होतं.