अभिनेता अजित कुमार (Ajith Kumar) हा साऊथ सिनेइंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. केवळ साऊथच नव्हे तर, जगभरात त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्याच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर, बाईक प्रेमामुळे देखील तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रचंड स्टारडम असूनही, तो असा एक सेलिब्रिटी आहे, जो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतो. इतकी लोकप्रियता मिळवणारा हा अभिनेता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. इतकेच नाही, तर अजित कुमार स्वतः मोबाईल फोन देखील वापरत नाही.
हो. तुम्ही वाचलं ते खरंय..अभिनेता अजित कुमारकडे स्वतःचा मोबाईल फोन नाही. आता अभिनेता मोबाईल वापरत नाही, तर इतरांशी संवाद कसा साधतो, असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनेत्याचा मॅनेजर. अजित कुमारचा मॅनेजर या सगळ्या गोष्टींची व्यवस्था सांभाळतो. कोणत्याही गोष्टीसाठी अभिनेत्याशी संपर्क साधायचा असल्यास, ते काम मॅनेजरतर्फे केले जाते. यामुळेचा अभिनेत्याला काधीच स्वतःच्या फोनची गरज भासली नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर अजित कुमारचे स्वतःचे अकाऊंट नसल्यामुळे, त्याच्या मॅनेजरच्या ट्विटर अकाऊंटद्वारेच सगळ्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जातात. यातील प्रत्येक निवेदनावर अजित कुमारची स्वाक्षरी असते.
अभिनेता अजित कुमार स्वतः जरी मोबाईल वापरत नसला आणि सोशल मीडियावर सक्रिय नसला, तरी त्याच्याविषयीच्या सगळ्या अपडेट्स या वेळोवेळी चाहत्यांना मिळत असतात. विशेष बाब म्हणजे प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगवेळी अजित कुमारला वेगळे सिम कार्ड दिले जाते. तर, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, तो नवीन प्रोजेक्टसाठी सिम कार्ड बदलतो. सध्या त्याच्यासोबत काम न करणाऱ्या लोकांच्या अनावश्यक फोन कॉल्स आणि मेसेजेसचा त्याला त्रास होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते.