Join us  

कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 8:49 AM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला आणि सध्या सांताक्रूझ परिसरात राहणारा मनविंदर गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडत होता

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ व तिचा अभिनेता पती विकी कौशल यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या मनविंदरसिंह या स्ट्रगलर अभिनेत्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. मनविंदर कतरिनाचा चाहता असून, त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला आणि सध्या सांताक्रूझ परिसरात राहणारा मनविंदर गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडत होता. तिच्याशी लग्न करण्याची मनीषा तो बाळगून होता. यापूर्वीही मनविंदरने त्याचे आणि कतरिनाचे मॉर्फ्ड केलेले फुटेज आणि फोटो व्हायरल केले होते. कौशलला जिवे मारण्याची मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सांताक्रूझ पोलीस ठाण्यात कौशलच्या तक्रारीवरून ५०६(२), ३५४(डी) आणि भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ६७ आयटी कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने तक्रार केली होती की, एक व्यक्ती धमकी देत आहे आणि धमकीचे संदेश इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहे. त्याने सांगितले की, आरोपी त्याच्या पत्नीचा पाठलाग करत आहे आणि तिला धमकावत आहे. सध्या श्रीराम राघवनच्या मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कतरिनाला कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आली होती. रिहर्सल दरम्यान सेटवरील अनेक छायाचित्रे कतरिनाने सोशल मीडियावर शेअर केले. त्यातही छेडछाड करण्यात आल्याचा या जोडप्याचा आरोप होता. आम्ही आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोण मनविंदर?   छोट्या पडद्यावरील मालिका तसेच चित्रपटांमध्ये भूमिका मिळाव्यात म्हणून मनविंदर प्रयत्नशील होता.  मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्याकडे काम नव्हते. त्यातून आलेल्या वैफल्यातून मनविंदरने हे कृत्य केले असावे, असा कयास आहे. मनविंदर मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल