ग्लॅमरच्या दुनियेत एका रात्रीत स्टार झालेले आणि आता ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर असणारे अनेक स्टार्स इंडस्ट्रीत आहेत. अशीच एक अभिनेत्री... 90 च्या दशकात इंडस्ट्रीत आली आणि सगळेच तिच्या प्रेमात पडले. फोटो पाहून आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला कळलं असेलच. अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. फोटोतील ही निष्पाप चेहऱ्याची अभिनेत्री आहे नीलम.
हा फोटो नीलमच्या ‘जवानी’ या पहिल्या सिनेमाचा आहे. 1984 साली आलेल्या या सिनेमात नीलमच्या अपोझिट करण शाह हा हिरो होता. नीलमचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. तिचं शालेय शिक्षणही तिथेच झालं. सुट्टीत ती मुंबईला आली आणि याचदरम्यान तिला ‘जवानी’ची ऑफर मिळाली. त्यावेळी ती केवळ 15 वर्षांची होती.
‘जवानी’मध्ये एक कोवळ्या वयातील प्रेमी युगलाची कथा होती. त्यामुळे नीलम या भूमिकेसाठी अगदी फिट होती. शर्मिला टागौर, नवीन निश्चल, मौसमी चॅटर्जी, अनुपम खेर असे दिग्गज स्टार या सिनेमात होते. चित्रपटात अनुपम यांनी नीलमच्या वडिलांची भूमिका साकारली होती. रमेश बहल यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. पण या चित्रपटातील नीलम सगळ्यांनाच भावली.
1986 मध्ये नीलम गोविंदासोबत ‘इल्जाम’मध्ये झळकली आणि हा सिनेमा तुफान चालला. यानंतर नीलमने कधीच मागे वळून बघितलं नाही. लव्ह 86, खुदर्ग, हत्या, ताकतवर, आग ही आग, पाप की दुनिया, खतरों के खिलाडी, मिट्टी और सोना, घर का चिराग अशा अनेक सिनेमांत ती झळकली.
बॉलिवूडमध्ये तिची आणि गोविंदाची जोडी तुफान गाजली. इतकी की, या जोडीला साईन करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू असायची. दोघांनीही एक-दोन नव्हे तर 14 सिनेमांत एकत्र काम केलं. पण करिअरच्या शिखरावर अचानक नीलमने बॉलिवूडला रामराम ठोकला. आता ती काय करते तर बिझनेस. होय, भलेही फिल्मी दुनियेतून ती गायब झाली असेल पण बिझनेसच्या दुनियेत मात्र ‘नीलम’सारखीच चमकत आहे. अगदी चित्रपटांतून कमावले नाहीत तितके पैसे बिझनेसमधून कमावते आहे. एका रिपोर्टनुसार, तिची नेटवर्थ 1 मिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे.
नीलम ही मुळातच एका हिरा व्यापाऱ्याची लेक. त्यामुळे चित्रपटात येण्यापूर्वीच ती हिऱ्याच्या दागिण्यांच्या व्यवसायात आली होती. नीलमच्या तीन पिढ्या ज्वेलरी इंडस्ट्रीत होत्या. वडिल शिशीर कोठारी हेही या बिझनेसमधील मोठं नाव. त्यामुळे नीलमच्या कुटुंबाचा ज्वेलरी बिझनेस युरोप, अमेरिका, थायलंड, आशियात पसरला आहे. नीलमने मुंबईत ज्वेलरी डिझाईनिंगचा एक फॉर्मल कोर्स केला आणि यानंतर ती या बिझनेसमध्ये उतरली. आज नीलम या इंडस्ट्रीतील मोठ्ठ नाव बनलं आहे.