रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांनी ये जवानी है दिवानी, तमाशा, बचना ए हसिनो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना चांगलीच आवडते. ते दोघे कोणत्या चित्रपटात एकत्र दिसणार याची त्यांचे चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहात असतात.
दीपिका आणि रणबीर एकेकाळी नात्यात होते. पण काही कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले आणि आज ते दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. दीपिकाचे लग्न अभिनेता रणवीर सिंगसोबत झाले आहे तर रणबीर आलिया भटसोबत नात्यात आहे. रणबीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत त्या दोघांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
रणबीर आणि दीपिका नात्यात होते अशी चर्चा त्या काळात मीडियात चांगलीच रंगली होती. रणबीरने 2011 ला टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तुम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहात, त्या अभिनेत्रीसोबत मी नात्यात होतो. मी काही वर्षांपूर्वी तिच्यासोबत काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान आमच्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि आम्ही त्यानंतर आम्ही प्रेमात पडलो. पण आमच्या नात्यात सगळे काही सुरळीत सुरू नाहीये याची आम्हाला जाणीव झाल्याने आम्ही ब्रेकअप करण्याचे ठरवले. पण आम्ही दोघे खूप मॅच्युर्ड असल्याने आम्ही ही परिस्थिती खूपच चांगल्याप्रकारे हाताळली. त्या काळात एक व्यक्ती म्हणून मला खूप काही शिकायला मिळाले. मी दीड वर्षं त्या व्यक्तीसोबत होतो. या काळात माझी प्रचंड प्रगती झाली. तो अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता. कारण त्या काळात मी खूप काही शिकलो. मी यामुळे कमिटमेंटला अधिक महत्त्व द्यायला लागलो. मी कधीच कमिटमेंटला घाबरत नाही. मी लग्न केले तर माझे स्टारडम कमी होईल असा विचार करणारा देखील मी नाहीये. मी एखाद्या मुलीवर जर मनापासून प्रेम करतोय असे मला वाटले तर मी नक्कीच तिच्यासोबत लग्न करेन...